इस्रायल आणि पॅलेस्टाईनची कट्टरतावादी संघटना हमास यांच्यात सध्या युद्धाचा भडका उडाला आहे. या संघर्षात अनेक इस्लामिक देश हे इस्रायलला उघडपणे विरोध करताना दिसत आहेत. भारताचा शेजारी असलेला बांगलादेशही याचं भूमिकेत आहे. बांगलादेशातील जनताही पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहे. प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
तस्लिमा नसरीन म्हणाल्या की, “पॅलेस्टिनींवरील अत्याचारामुळे त्रस्त असलेल्या आपल्या देशबांधवांनीही आपल्या देशातील अल्पसंख्याकांच्या दुर्दशेचा तितकाच विचार केला पाहिजे. मी ऐकले आहे की, माझे सहकारी बांगलादेशी नागरिक पॅलेस्टिनींवरील अत्याचारांबद्दल खूप चिडलेले आहेत. संतप्त झाले आहेत. काही लोकांना पॅलेस्टाईनमध्ये जाऊन मदत करण्याची इच्छा आहे. वैयक्तिकरित्या, मी कुठेही कोणत्याही अत्याचाराच्या विरोधात आहे. याचा मी निषेध करते.”
पुढे त्या म्हणाल्या, “मला सांगायचे आहे की, बांगलादेशातील लोकांना पॅलेस्टाईनमधील हल्ले आणि निर्वासितांबद्दल एवढीच काळजी वाटत असेल तर बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले होत असताना त्यांची सद्सद्विवेकबुद्धीही अस्वस्थ व्हायला हवी. लोकांना घरे सोडायला भाग पाडले जाते.” पीटीआयला देत असलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हे ही वाचा:
मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याचा पोलिसांना फोन!
इराणचा इशारा; गाझावरील हल्ले इस्रायलने थांबवावेत नाहीतर….
भारतापुढे पाकिस्तानची दाणादाण, भारताचा आठवा वर्ल्डकप विजय
प्रशांत किशोर यांनी दिले नीतिश कुमारांना आव्हान
दरम्यान, इस्रायलच्या संरक्षण दलाने गाझा शहर आणि उत्तर गाझा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अल्टिमेटमं दिला आहे. नागरिकांना तीन तासांचा वेळ दिला असून या भागात राहणाऱ्या रहिवाशांनी सकाळी १० ते दुपारी एकच्या दरम्यान उत्तर गाझातून तातडीने दक्षिण गाझाच्या दिशेने प्रवास करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रहिवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या काळात ठरवून दिलेल्या मार्गावर इस्रायलकडून हल्ला केला जाणार नाही, असंही इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे. या युद्धात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. तर, जखमींची संख्याही मोठी आहे.