दुबई येथे सुरू असलेल्या आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कप मध्ये आजपासून ‘सुपर १२’ या फेरीला सुरुवात होत आहे. या फेरीत जगातले टी-२० क्रिकेटमधले १२ दादा संघ एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे आज पासून सुरू होणारी ही फेरी क्रिकेट चाहत्यांसाठी एक आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे.
रविवार १७ ऑक्टोबर पासून टी-२० वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यांना सुरुवात झाली. यामध्ये दोन गटात विभागलेले आठ संघ एकमेकांसोबत खेळले असून त्यातून चार संघ हे पुढल्या फेरित म्हणजेच सुपर १२ फेरीमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये बांगलादेश, स्कॉटलंड, नामिबिया आणि श्रीलंका अशा चार संघांचा समावेश आहे. त्यामुळे आता सुपर १२ फेरिच्या दोन गटात विभागलेले बारा संघ एकमेकांना भिडणार आहेत. यामध्ये पहिल्या गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका वेस्टइंडीज, श्रीलंका आणि बांगलादेश या सहा संघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्थान, नामिबिया आणि स्कॉटलांड हे संघ असणार आहेत. या दोन्ही गटातून प्रत्येकी दोन दोन संघ पुढल्या फेरीत म्हणजेच उपांत्यफेरीत दाखल होणार आहेत. उपांत्य फेरी १० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर रोजी खेळली जाईल. तर त्यातून विजेते होणारे दोन संघ हे १४ नोव्हेंबरला दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर अंतिम सामना खेळतील.
हे ही वाचा:
…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन
‘अविघ्न पार्क’ अग्नितांडवानंतर पालिकेला जाग; अग्निशमन यंत्रणेचा घेणार आढावा
काँग्रेसच्या सभेबाहेर शेतकरी सांगतात आमचे मत भाजपालाच
संघाची बदनामी जावेद अख्तरांना भोवणार? फौजदारी तक्रार दाखल
आजपासून सुरू होणाऱ्या सुपर १२ फेरीच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांची लढत पाहायला मिळणार आहे. तर दुसर्या सामन्यात इंग्लंड समोर वेस्टइंडीजचे आव्हान असणार आहे. तर उद्या म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान हा सर्वात रोमांचक सामना रंगणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे या सामन्याकडे लक्ष लागून राहिले आहे.