भारतात होत असलेल्या जी-२० परिषदेच्या निमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सपत्निक भारतात आले आहेत. यानिमित्ताने त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, मी स्वतःला हिंदू मानतो आणि त्याचा मला अभिमान आहे. त्याचवेळी ऋषी सुनक म्हणाले की, आपल्या या छोटेखानी दौऱ्यात भारतातील काही प्रमुख देवळांनाही आपण भेट देणार आहोत.
ऋषी सुनक म्हणाले की, मला हिंदू असल्याचा अभिमान वाटतो आणि माझे संगोपन तसेच झाले आहे. मी तसाच आहे. पुढील काही दिवस भारतात असताना मी काही मंदिरांना जरूर भेट देईन. रक्षाबंधन आणि जन्माष्टमीबद्दल बोलताना ऋषी सुनक म्हणाले की, आम्ही नुकतेच रक्षाबंधन साजरे केले. माझ्या बहिणी, चुलत भावंडे एकत्र आलो होतो. राखीही बांधली. पण जन्माष्टमी आम्हाला साजरी करता आली नाही. पण आशा आहे की, यावेळी मी काही मंदिरांना भेटी देणार आहे.
हे ही वाचा:
आमदार रवींद्र वायकर यांनी तथ्य दडपले!
रशिया-युक्रेन युद्धामुळे विभागलेल्या जगाला भारत एकत्र आणू इच्छितो!
जी-२० परिषदेच्या भारत मंडपममध्ये सजला कलामेळा
अमरावतीत साकारणार नवीन विभागीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
ऋषी सुनक म्हणाले की, कशावरही विश्वास असणे, श्रद्धा असणे हे आपल्या जगण्यावर विश्वास असण्यासारखे आहे. विशेषतः मी ज्या प्रकारचे काम करत आहे, अशा तणावपूर्ण कामात श्रद्धाच तुम्हाला बळ देते, शांतता प्रदान करते. त्यामुळे ती महत्त्वाची आहे. शुक्रवारी ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती भारतात दाखल झाले. दिल्लीतील पालम विमानतळावर त्यांचे आगमन झाले. केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी त्यांचे स्वागत केले. तेव्हा जय सियाराम बोलत दोघांनीही एकमेकांना अभिवादन केले.
अश्विनी चौबे यांनी ऋषी सुनक यांनी रुद्राक्षही भेट दिले तसेच भगवद्गीतेची प्रत आणि हनुमान चालिसाही दिली.