इस्रायल आणि हमास यांच्यातील सुरू असलेलं युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. अशातच भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर या युद्धाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे उप-स्थायी प्रतिनिधी (डीपीआर) राजदूत आर. रवींद्र यांनी बुधवार, २५ ऑक्टोबर रोजी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.
“इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर रोजी झालेला दहशतवादी हल्ला धक्कादायक होता आणि आम्ही त्याचा निषेध करतो. आमचे पंतप्रधान प्राणहानीबद्दल शोक व्यक्त करणारे, निष्पाप बळी आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा देणाऱ्या पहिल्या जागतिक नेत्यांपैकी एक होते,” असे वक्तव्य संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ‘पॅलेस्टिनी प्रश्नासह मध्य पूर्वेतील परिस्थिती’ या विषयावरील खुल्या चर्चेत भारताचे प्रतिनिधित्व करताना रवींद्र यांनी केले.
जेव्हा इस्रायलला या दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जावे लागते, तेव्हा या संकटाच्या वेळी आम्ही त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत. सध्याच्या संघर्षातील नागरिकांचा मृत्यू ही गंभीर आणि सतत चिंतेची बाब आहे. विशेषतः महिला आणि मुले यांचे संरक्षण केले पाहिजे, असं त्यांनी सांगितले.
आर. रवींद्र यांनी आपल्या भाषणात इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान गाझा पट्टीतील नागरिकांना मानवतावादी मदत पाठविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना देखील अधोरेखित केले. “या भागात ३८ टन अन्न आणि महत्त्वपूर्ण वैद्यकीय उपकरणे पाठवली आहेत. भारताने नेहमीच इस्रायल- पॅलेस्टाईनचा प्रश्न चर्चेतून सोडवण्याची भाषा केली आहे. आम्ही आमच्या द्विपक्षीय विकास भागीदारीद्वारे पॅलेस्टिनी लोकांना पाठिंबा देत आहोत, ज्यात आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, उद्योजकता आणि माहिती तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.”
हे ही वाचा:
युएन प्रमुखांकडून इस्रायल- हमासमध्ये युद्धविराम करण्याची मागणी
इस्रायली नागरिकाला बंदी बनवण्यासाठी हमासची ‘ऑफर’!
गरबा खेळताना भोवळ येवून तरुणाचा मृत्यू!
‘प्रधानमंत्री स्वनिधी’चा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा
“भारत या आव्हानात्मक काळात पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवत राहील. दोन्ही देशांमधील वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्षावर शांततापूर्ण आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भारत वचनबद्ध आहे,” अशी भूमिका आर. रवींद्र यांनी स्पष्ट केली.