ऑनलाइन घोटाळे करण्यासाठी हजारो लोकांची आशिया खंडातून तस्करी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशा एक हजार जणांची सुटका फिलिपाइन्सने केली. फिलिपाइन्समध्ये अनेक आशियाई देशांमधी लोकांची तस्करी करून बंदिवासात ठेवण्यात आले होते. तसेच, त्यांना ऑनलाइन घोटाळे करण्यासाठी भाग पाडले जात होते.
अलीकडच्या काही महिन्यांत या देशात इंटरनेट घोटाळे वाढले होते. त्यामध्ये तस्करी करून आणलेल्या पीडितांना फसवून त्यांच्यावर बोगस क्रिप्टो गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. मनिलाच्या उत्तरेला सुमारे ९० किमी अंतरावर असलेल्या मबालकॅट शहरातील इमारतींवर गुरुवारी पोलिस अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी एकूण एक हजार ९० लोकांची सुटका करण्यात आली.
या लोकांची ऑनलाइन घोटाळे चालवण्यासाठी भरती करण्यात आली होती, अशी माहिती फिलीपीन राष्ट्रीय पोलिस दलाच्या सायबर क्राइम विरोधी गटाच्या प्रवक्त्या मिशेल सबिनो यांनी दिली. पीडितांना अमेरिका, युरोप आणि कॅनडामधील संशयास्पद लोकांना लक्ष्य करण्यास भाग पाडले गेले. त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि त्यांच्याकडून दिवसाचे १८-१८ तास काम करवून घेतले जाई. त्यांनी सहकाऱ्यांशी संवाद साधला किंवा जास्त वेळ ‘ब्रेक’ घेतल्यास पगार कपात केली जात असे.
हे ही वाचा:
‘द केरळ स्टोरी’ हा अंतर्बाह्य हादरवून टाकणारा अनुभव
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे घामोळ्याच्या पावडरला फुटला घाम
मोचा चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता
बजरंग दल करणार सामुहिक हनुमान चालीसा पठण
‘त्यांना कोठडी नसलेल्या कैद्यासारखी वागणूक दिली जात असे. त्यांना त्यांच्या रूममेट्सशी बोलण्याचीही परवानगी नव्हती. तसेच, प्रवेशद्वाराच्या हद्दीबाहेर जाण्याचीही परवानगी नव्हती. १८ तासांच्या कामानंतर, त्यांना त्यांच्या वसतिगृहात आणले जात असे. हे पीडित बहुतेक चिनी नागरिक, व्हिएतनामी, फिलिपिनो आणि इंडोनेशियन होते, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी मलेशिया, थायलंड, तैवान, म्यानमार, हाँगकाँग आणि नेपाळमधील लोकांची सुटका केली.
कामगारांना अनोळखी व्यक्तींना क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी किंवा बनावट प्रेमसंबंध प्रस्थापित केल्यानंतर बोगस बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले होते.