रामायणाचे विश्वरूप दर्शन

रामायणाचे विश्वरूप दर्शन

भारतीय संस्कृतीचे आदिपुरूष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामांचा आज जन्मदिवस. अयोध्यापती श्रीराम हे भारताची ओळख आहेत. हे कालातीत सत्य आहे. म्हणूनच मग साल १९८७ असू दे किंवा २०२०, टिव्ही वर जेव्हा रामायण लागते तेव्हा त्याला मिळणारा प्रतिसाद हा तितकाच अभूतपूर्व असतो. पण रामायणाची ही लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही आहे. म्हणजे परदेशस्थित भारतीयांमधे और आहेच पण अभारतीयांनाही रामायणाने चांगलीच भुरळ घातली आहे.

भारताचे शेजारी देश नेपाळ आणि श्रीलंका यांचा तसा रामायणाशी थेट संबंध आहे. कारण माता सिता जिथल्या राजकन्या होत्या ते जनकपूर ठिकाण सध्याच्या नेपाळमध्ये आहे. तर प्रभू श्रीरामाने ज्याचा वध करून सितामातेची मुक्तता केली, तो रावण लंकाधीपती होता. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये रामायण प्रसिद्ध असणे स्वाभाविकच आहे. पण या सगळ्याच्या पलिकडे जाऊन दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये रामायणाचा प्रभाव आणि लोकप्रियता दिसून येते.

थायलंडचे रामाकेन
थायलंडमध्ये रामाकेन नावाने रामायण प्रसिद्ध आहे. ‘रामकेन’ नावाचे पुस्तक हे थायलंडचे राष्ट्रीय पुस्तक आहे. थायलंड देशात अयुथ्थया नावाचे राज्य आहे. हा ‘अयुथ्थया’ शब्द प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमी अयोध्यापासून तयार झाला आहे. इथले राजे स्वतःला प्रभू श्रीरामांचे वंशज मानायचे. थायलंडच्या अखेरच्या राजपरिवाराला ‘रामा’ असेच म्हटले जाते.

बर्मा आणि कंबोडिया
बर्मा देशातही रामायण हे महाकाव्य अतिशय लोकप्रिय आहे. तिथे त्याला ‘यामायना’ असे म्हटले जाते. बर्माच्या भाषेत ‘रामा’ चा उच्चार ‘यामा’ असा केला जातो. तर सिता मातेला ‘मे थिदा’ म्हणतात. बहुदा हे नाव ‘मैथिली’ या नावावरून आले असावे. कंबोडिया देशात रामायण हे ‘रामाकेर्ती’ म्हणून परिचित आहे. ‘रामाकेर्ती’ म्हणजे रामाची किर्ती.

हे ही वाचा:

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीचा भयंकर प्रकार; रुग्ण दगावल्याची भीती

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना, २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू

श्रीरामनवमी निमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा

नाशिक मनपा रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची राष्ट्रीय स्तरावर दखल

मलेशिया, जावा, इंडोनेशिया, जपान
मलेशियन भाषेतल्या रामायणाला ‘हिकायत सेरी रामा’ असे म्हणतात. ही रामायणाची मलेशियन आवृत्ती आहे. ज्यात कथेचा मुळ गाभा तसाच ठेऊन स्थानिक भाषेनुसार काही बदल करण्यात आले आहेत. तर जावा आणि इंडोनेशियामध्ये ‘काकावीन रामायण’ या नावाने हे महाकाव्य ओळखले जाते. जपानी भाषेत रामायणाचे दोन प्रकार आहेत ज्यांना ‘होबुत्सुसू’ आणि ‘संबो-एकोतोबा’ असे म्हणतात.

फिलीपीन्स, लाओस
फिलीपीन्स देशात ‘महारादिया लवाना’ या नावाने रामायण परिचीत आहे. ‘सिंगकिल’ हा तिथला स्थानिक नृत्यप्रकार रामायणावर आधारित आहे. तर लओस देशाचे राष्ट्रीय महाकाव्य हे रामायणावर आधारित आहे. ‘फ्रा लाक, फ्रा लाम’ असे त्याचे नाव.

या व्यतिरिक्त रशिया आणि मंगोलियातल्या ‘कालमिक’ लोकांवर रामायणाचा बराच प्रभाव दिसून येतो. तर तिकडे दक्षिण अमेरिकेतही रामायण प्रसिद्ध असल्याचे समजते. याचे ताजे उदाहरण म्हणजे भारताने जानेवारी महिन्यात ब्राझीलला कोरोनाची लस पाठवली. तेव्हा ब्राझीलचे पंतप्रधान जाईर बोलसोनारो यांनी संजीवनी आणणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्विट करत भारताचे आभार मानले होते.

या साऱ्या उदाहरणांमधून आपल्याला दिसून येते की प्रभू रामचंद्र आणि आपली भारतीय संस्कृती किती व्यापक आहे, वैश्विक आहे आणि तितकीच शाश्वताही आहे.

Exit mobile version