नाझी सैन्याचा भाग असलेल्या एका माजी सैनिकाचा गौरव केल्यामुळे कॅनडाच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’च्या अध्यक्षांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही माफीनामा दिला आहे. या माजी सैनिकाला युक्रेनचे अध्यक्ष व्होल्डोमिर झेलेन्स्की यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले होते. या माफीसंदर्भात झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय माध्यमांद्वारे संपर्क साधला जात आहे, असेही स्पष्टीकरण ट्रुडो यांनी दिले आहे.
‘हाऊस ऑफ कॉमन्स’चे अध्यक्ष अँथनी रोटा यांनी गेल्या शुक्रवारी माजी सैनिक यारोस्लॅव्ह हुंका यांना ‘युद्धवीर’ असे संबोधले होते. त्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली होती. यानंतर मंगळवारी त्यांनी या संपूर्ण घटनेला आपण सर्वस्वी जबाबदार आहोत, अशी कबुली देऊन पदाचा राजीनामा दिला होता. ९८ वर्षीय हुंका हे पोलंडला जन्मलेले युक्रेन नागरिक आहेत. ते दुसऱ्या जागतिक युद्धात ऍडॉल्फ हिटलरच्या युनिटचा भाग होते. त्यानंतर ते कॅनडाला स्थलांतरित झाले.
‘शुक्रवारी जे घडले, त्याबद्दल आणि या घटनेमुळे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि युक्रेनियन शिष्टमंडळ ज्या अडचणीच्या परिस्थितीत आले, त्याबद्दल मी या सभागृहातील आपल्या सर्वांच्या वतीने, दिलगिरी व्यक्त करू इच्छितो,’ असे ट्रूडो यांनी बुधवारी सभागृहात सांगितले. ‘अशाप्रकारे त्या व्यक्तीचा गौरव करणे ही महाभयंकर चूक होती. त्यामुळे नाझींच्या अनन्वित अत्याचाराने ग्रासलेल्या व्यक्तींच्या कटू स्मृती जागवल्या गेल्या,’ असे ट्रुडो म्हणाले.
हे ही वाचा:
कोल्हापुरात दोन मंडळांमध्ये राडा; दगडफेकीत तीन जखमी
जमीन गहाण टाकून ७५ लाखांच्या घोड्याची खरेदी; सुवर्णपदक विजेत्या घोडेस्वारांची कमाल!
सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!
नगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?
रशियाने आदल्या दिवशीच संपूर्ण कॅनडाच्या संसदेनेच नाझींचा जाहीररीत्या निषेध केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावरूनही ट्रुडो यांनी नाराजी व्यक्त केली होती. ‘अशाप्रकारे झालेल्या चुकीचे रशिया आणि त्यांच्या समर्थकांकडून राजकारण केले जात आहे. युक्रेनच्या लढ्याविरोधात अशा प्रकारे खोटा प्रचार करणे, अत्यंत खेदजनक आहे,’ अशी प्रतिक्रिया ट्रुडो यांनी दिली होती.