‘स्वतःच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणाऱ्या भारतविरोधी तत्त्वांवर कॅनडा कारवाई करेल,’ असा विश्वास विदेशी मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केला आहे. कॅनडाने कट्टरवादी, दहशतवादी आणि भारतविरोधी तत्त्वांना दिलेला आश्रय… हाच कॅनडाबाबत प्रमुख मुद्दा असल्याचे बागची यांनी अधोरेखित केले.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. तर, भारताने हे दावे बेछूट आणि राजकारणाने प्रेरित असल्याचा आरोप करत फेटाळून लावले आहेत. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतही खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नून याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून त्यात भारताचा हात असल्याचे म्हटले आहे.
या घटनेनंतर भारत आणि कॅनडाच्या संबंधांमध्ये आमूलाग्र बदल झाले असतील, अशी प्रतिक्रिया कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दिली होती. तसेच, दोन्ही देशांत व्यापार वृद्धिंगत करण्यावर भर देण्यावरही त्यांनी जोर दिला होता. मात्र त्याबरोबरच कॅनडातील नागरिकांचे अधिकार, नागरिकांची सुरक्षा आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. त्यावर बागची यांनी ‘जेव्हाही हा मुद्दा आणला जातो, तेव्हा भारताने सुसंगत कृती केली आहे,’ असे स्पष्ट केले.
हे ही वाचा:
चांद्रयान- ३ च्या ऐतिहासिक कामगिरीसाठी आइसलँडकडून ‘इस्रो’चा सन्मान
भावाला किडनी दिली म्हणून दिला तिहेरी तलाक!
कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकीनंतर साक्षी मलिक, विनेश फोगटचा कुस्तीला रामराम!
लोकसभेतून आणखी तीन विरोधी खासदार निलंबित!
‘मला वाटते, आम्ही या समस्येकडे कसे पाहतो, यावर आम्ही प्रकाश टाकला आहे. त्या देशात कट्टरपंथी, दहशतवादी आणि भारतविरोधी तत्त्वांना दिले जाणारे स्थान हाच प्रमुख मुद्दा असल्याचे स्पष्ट आहे. आता दोन्ही देशांमधील परिस्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळे स्वतःच्या देशात भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणाऱ्या कट्टरवाद्यांवर तेथे निश्चित कारवाई केली जाईल,’ असा विश्वास बागची यांनी व्यक्त केला आहे.