भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार उसळला असून सातत्याने येथे हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. यासोबतच बौद्ध आणि ख्रिश्चनांवर हल्ले होत आहेत. या हल्ल्यांबाबत जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हा मुद्दा आता कॅनडामधील संसदेत देखील उपस्थित करण्यात आला आहे. कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी म्हटले की, बांगलादेश अस्थिर होतो, त्यावेळी तेथील हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चनांवर हल्ले होतात.
भारतीय वंशाचे कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी सोमवारी (स्थानिक वेळेनुसार) बांगलादेशात हिंदूंविरुद्ध सुरू असलेल्या हिंसाचारावर तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच त्यांनी कॅनडाच्या संसदेत दिलेल्या निवेदनात, बांगलादेशातील हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चनांसह धार्मिक अल्पसंख्याकांना भेडसावत असलेल्या त्रासदायक परिस्थितीवर प्रकाश टाकला. बांगलादेशातील अस्थिरतेच्या काळात या गटांना, विशेषतः हिंदूंना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो, असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. १९७१ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून बांगलादेशच्या लोकसंख्येमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांचा वाटा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, हा मुद्दाही त्यांनी प्रकाशझोतात आणला.
बांगलादेशमधील परिस्थिती चिंताजनक असून कॅनडातील हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरिकांनाही आता बांगलादेशमधील त्यांच्या नातेवाईकांची आणि त्यांच्या संपत्तीची काळजी वाटू लागली आहे, असेही आर्य म्हणाले. तसेच या परिस्थितीकडे कॅनडा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी संसदेसमोर निर्देशने करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात कॅनडातील हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा :
लखनौमध्ये महिला पोलीस उपनिरीक्षकालाच पळवून नेले!
जिओचे नेटवर्क गायब; सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या तक्रारी
स्वयंसेवक ते पंतप्रधान… कसा होता नरेंद्र दामोदरदास मोदींचा ७४ वर्षांचा प्रवास?
नागालँड नागरिक हत्या प्रकरण: ३० जवानांवरील फौजदारी खटला रद्द
दरम्यान, बांगलादेशात झालेल्या सत्तापालटानंतर देशभरात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यादरम्यान बांगलादेशातील हिंदूंसह अन्य अल्पसंख्यक समाजाच्या नागरिकांवर हल्ले करण्यात येत आहे. याशिवाय अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. अनेक मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे.