पाकिस्तानमध्ये २०२० मध्ये अतिरेक्यांनी हिंदू मंदिराची तोडफोड केल्यानंतर ११ धार्मिक नेत्यांसह १२३ लोकांवर दंड ठोठावण्यात आला. मात्र, हा दंड आरोपींनी देण्याऐवजी हिंदू समाज भरत आहे. हिंदू समाज पुन्हा कट्टरवाद्यांच्या रोषाला बळी पडू नये म्हणून भीतीपोटी हा दंड हिंदू समाजच भरत असल्याचे वृत्त आहे.
डिसेंबर २०२० मध्ये खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तानमध्ये, करक मंदिराची कट्टरवाद्यांनी तोडफोड केली होती. आता या हल्ल्यात सहभागी असलेल्या ११ धार्मिक नेत्यांसह १२३ जणांना ठोठावण्यात आलेला दंड हा अखिल पाकिस्तान हिंदू परिषदेच्या निधीतून भरण्यात येणार आहे.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने खैबर पख्तूनख्वामधील हिंदू मंदिर तोडणाऱ्या आरोपींकडून मंदिराच्या बांधकामासाठी दंड ठोठावला होता आणि या आरोपींकडून वसुली करण्यात यावी, असे सांगितले होते. मात्र, स्थानिक धर्मगुरूंच्या मदतीने हिंदू मंदिर पाडण्यात आल्याचे प्रशासनाला माहीत होते. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासनाने मंदिर उभारणीत कोणतेही सहकार्य केले नाही.
हे ही वाचा:
परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याची माहिती
विलिनीकरण की पगारवाढ; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कोणता तोडगा?
‘स्वर्गीय सृष्टी सौंदर्याचे आपले पूर्वांचल’ पुस्तकातून दिसतो पूर्व भारताचा नजारा
न्यायालयाने आरोपींवर तीन कोटीपेक्षाही जास्त रुपयांचा दंड ठोठावला होता. या दंडाच्या रकमेमधील हिंदू समाजातील लोकांनी २.६८ लाख जमा केले आहेत. तसेच दंड भरू न शकणाऱ्या आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले आहे.
मीडियाच्या अहवालानुसार, न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासन किंवा कोणत्याही अधिकार्यांनी मंदिराच्या बांधकामात रस दाखवलेला नाही, असे स्थानिक हिंदू नेत्याने सांगितले आहे. मौलवींच्या भीतीमुळे अधिकाऱ्यांनीही आम्हाला मदत केली नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, मौलवींचा रोष टाळण्यासाठी हिंदू परिषदेने आरोपींना लावलेला दंड स्वतःच भरण्याचा निर्णय घेतला.