भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये सत्ता पालट झाल्यानंतर सातत्याने अल्पसंख्यांक विशेषतः हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. हिंदूंना लक्ष्य करून त्यांची घरे जाळणे, मारहाण करणे, मंदिरांची तोडफोड अशा घटना सातत्याने घडत असल्याचे समोर येत आहे. अशातच बांगलादेशमध्ये एका हिंदू नेत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. हिंदू समुदायाच्या एका प्रमुख नेत्याचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली.
बांगलादेशच्या दिनाजपूर जिल्ह्यातील एका प्रमुख हिंदू समुदायाच्या नेत्याचे त्यांच्या घरातून अपहरण करून त्यांना मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. ढाक्यापासून सुमारे ३३० किमी वायव्येस असलेल्या दिनाजपूरमधील बासुदेवपूर गावातील रहिवासी ५८ वर्षीय भावेश चंद्र रॉय यांचे दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी त्यांच्या घरातून अपहरण केले आणि त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेश चंद्र रॉय यांचे अपहरण झाल्यानंतर काही तासांत त्यांचा मृतदेह सापडला.
भावेश चंद्र रॉय हे बांगलादेश पूजा उत्सव परिषदेच्या बिरल युनिटचे उपाध्यक्ष आणि परिसरातील हिंदू समुदायाचे एक प्रमुख नेते होते. सध्या भावेश यांच्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असून पोलिस संशयितांना ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी काम करत आहेत.
हे ही वाचा :
दिल्लीत इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू
जम्मू आणि काश्मीरमध्ये सैनिकांकडून प्राध्यापकाला मारहाण?
नालासोपाऱ्यात घुसखोर बांगलादेशीला अटक, आतापर्यंत ९ जण ताब्यात!
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, युक्रेनमध्ये युद्धविराम शक्य!
भावेश चंद्र रॉय यांच्या पत्नी शांतना यांच्यानुसार, गुरुवारी भावेश हे घरी असताना संध्याकाळी ४.३० च्या सुमारास त्यांना एक फोन आला. भावेश घरी आहेत की नाही? याची खात्री करून घेण्यासाठी हा फोन आल्याचे शांतना यांचा दावा आहे. यानंतर आलेल्या चार जणांनी भावेश याला घरातून बाहेर नेले. भावेश याला शेजारच्या गावात घेऊन गेले. तिथे निदर्यतेने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर एका व्हॅनमधून आले आणि त्यांनी भावेश यांना घराजवळ फेकून दिलं. कुटुंबियांना याची माहिती मिळताच त्यांनी भावेश यांना रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी भावेश यांना मृत घोषित केलं.