खलिस्तानी दहशतवादी असणाऱ्या पन्नून याला कॅनडामध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी कॅनडास्थित हिंदू गटाने केली आहे. गुरपतवंत सिंग पन्नूनने कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदू आणि भारतीयांमध्ये भीती पसरवल्याचा आरोप कॅनडास्थित हिंदू मंचाने केला आहे.
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनच्या ‘द्वेषपूर्ण भाषणा’वर तीव्र आक्षेप घेत, मंगळवारी ‘हिंदू फोरम कॅनडा’ (एचएफसी)ने कॅनडाच्या प्रदेशात त्याच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याची मागणी केली आहे. पन्नून याने कॅनडामध्ये राहणारे हिंदू आणि भारतीयांमध्ये भीती पसरवल्याचा दावा केला आहे. एचएफसीचे कायदेशीर सल्लागार पीटर थॉर्निंग यांनी कॅनडाच्या ‘हाउस ऑफ कॉमन्स’चे इमिग्रेशन, निर्वासित आणि नागरिकत्व मंत्री (आयआरसीसी) मार्क मिलर यांच्याकडे मंचाची चिंता व्यक्त केली. मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक तपास करून पन्नूनला कॅनडात प्रवेश करण्यास ‘अयोग्य’ मानण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘गुरपतवंत सिंग पन्नून याच्याबद्दलची गंभीर चिंतेची बाब मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. तो सध्या शिख फॉर जस्टिस (शीख फॉर जस्टिस) म्हणून ओळखल्या जाणार्या अमेरिकास्थित संघटनेचे कायदेशीर प्रतिनिधी म्हणून काम करतो. ही संघटना स्वतंत्र शीख राष्ट्राच्या स्थापनेला समर्थन देते. याव्यतिरिक्त, पन्नून या वकिलाने १८ जून रोजी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर त्याच्या समर्थनार्थ निवेदन जाहीर केले होते,’ असे पत्रात नमूद केले आहे. तसेच, पन्नून याला भारताने दहशतवादी म्हणून घोषित केले असून त्याच्या ‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे, याकडे वकिलांनी लक्ष वेधले आहे. अशा प्रकारे भारताने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या आणि भारतात बंदी असलेल्या संघटनेच्या प्रतिनिधीला कॅनडामध्ये प्रवेश दिल्यास त्याच्या द्वेषपूर्ण भाषणांमुळे दोन्ही देशांचे संबंध आणखी बिघडू शकतात, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
कॅनडा आणि भारताचे द्विपक्षीय संबंध दीर्घकाळापासून चांगले राहिले आहेत. दोन्ही देश लोकशाही, बहुसंख्यतत्त्ववादावर विश्वास ठेवतात. कॅनडामध्ये भारतीय वंशाचा मोठा समुदाय राहतो. कॅनडाच्या लोकसंख्येपैकी सुमारे चार टक्के लोक (सुमारे १३ लाख) भारतीय वंशाचे आहेत, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
हे ही वाचा:
मध्य प्रदेशात १२ वर्षीय मुलीवर बलात्कार
रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा फटका हवाई दल अधिकाऱ्याला; सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला १.५४ कोटींचा दंड
रायफल स्पर्धेत सिफ्ट कौर सामराची सुवर्ण, आशी चौक्सीची कांस्य पदकाला गवसणी
एनआयएकडून खलिस्तानी- गँगस्टर्स विरोधात कारवाईचा बडगा
पन्नून याने नुकताच एक व्हिडीओ प्रसिद्ध करून कॅनडात राहणाऱ्या भारतीय-कॅनडियन हिंदूंनी कॅनडा सोडून जाण्याची धमकी दिली होती. ज्या देशाकडून या हिंदूंना फायदा होत आहे, त्यांच्याच विरोधात ते काम करत आहेत, असा आरोप पन्नूने या व्हिडीओत केला होता. त्यामुळे हिंदू मंचाने पन्नूनच्या या द्वेषपूर्ण विधानाचा तपास करून त्याला कॅनडात प्रवेश करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी केली आहे.