पाकिस्तानमधील हिंदूंवरील अत्याचार कमी होत नसताना आता आणखी एका हिंदू कुटुंबावर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मशिदीतून पिण्याचे पाणी घेतल्यामुळे एका हिंदू व्यक्तीला ओलीस ठेवण्यात आले. या व्यक्तीने धार्मिक स्थळाचे पावित्र्य भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पंजाबच्या रहिमियार खान शहरात राहणारा आलम राम भील, त्याची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह शेतात कच्चा कापूस काढत होता. भील यांनी सांगितले की, जेव्हा त्यांचे कुटुंब जवळच्या मशिदीबाहेर असलेल्या नळाचे पाणी पिण्यासाठी गेले तेव्हा त्यांना काही स्थानिक जमीनदारांनी मारहाण केली.
जेव्हा राम यांचे कुटुंब कच्चा कापूस उतरवल्यानंतर घरी परतत होते, तेव्हा जमीनदारांनी त्यांना त्यांच्या आऊट हाऊसमध्ये ओलीस ठेवले होते आणि मशिदीच्या पावित्र्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर अत्याचार केले. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, कारण हल्लेखोर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या स्थानिक खासदारांशी संबंधित होते, असे भील यांनी सांगितले.
हे ही वाचा:
तक्रारदार स्थानबद्ध तर गावगुंड राज्यभर मुक्त
रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा
पीटीआयच्या दक्षिण पंजाब अल्पसंख्यांक शाखेचे सरचिटणीस युधिष्टिर चौहान यांनीही सत्ताधारी पक्षाच्या खासदाराच्या प्रभावामुळे या प्रकरणापासून दूर राहणे पसंत केल्याचे सांगत या घटनेत लक्ष घातले नाही. पोलिसांनी अखेर पाकिस्तान दंड संहितेच्या कलम ५०६, १५४, ३७९, १४८ आणि १४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला. उपायुक्त डॉ. खुरम शेहजाद म्हणाले की, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी ते सोमवारी हिंदू समाजाच्या ज्येष्ठांना भेटतील.
पाकिस्तानमध्ये फक्त ७५ लाख लोकसंख्या असलेल्या अल्पसंख्यांक हिंदू समुदायावर अनेकदा छळ होत असतात. ऑगस्ट महिन्यात आठ वर्षांच्या एका हिंदू मुलावर ईश्वरविषयी निंदा या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर एका मदरसाच्या कार्पेटवर लघवी केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.