इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या हवाई दलाचा कमांडर ठार

इराण समर्थित हिजबुल्लाह सदस्यांना लक्ष्य करणारा आठवडाभरातील चौथा हल्ला

इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या हवाई दलाचा कमांडर ठार

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान दुसऱ्या बाजूने लेबनॉनमधील हिजबुल्लाह दहशतवादी गटानेही इस्रायलवर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. याला इस्रायलकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लक्ष्यांवर इस्रायलचा हल्ला सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून याची तीव्रता वाढली असून इस्रायलने हिजबुल्लाहवर चौफेर हल्ला चढवला आहे. दरम्यान, इस्रायलच्या पंतप्रधानांनी दक्षिण लेबनॉनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पूर्वीच हा परिसर रिकामा करण्याचे आवाहन केले होते. अशातच आता इस्रायलने केलेल्या एका हल्ल्यात हिजबुल्लाहचा वरिष्ठ कमांडर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी इस्रायलने बेरूतमध्ये हल्ला केला होता. यात हिजबुल्लाहच्या हवाई दलाचा कमांडर मुहम्मद हुसेन सरूर ठार झाल्याची माहिती इस्रायल सैन्याने दिली आहे. इस्रायल सैन्याच्या म्हणण्यानुसार, मुहम्मद सरूर ने इस्त्रायलवर स्फोटकांनी भरलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्रांसह असंख्य हवाई हल्ले केले होते आणि त्या हल्ल्याचे कमांड दिले होते. इराण समर्थित हिजबुल्लाह सदस्यांना लक्ष्य करणारा हा आठवडाभरातील चौथा हल्ला होता.

१९८० च्या दशकात हिजबुल्लाहमध्ये मुहम्मद हुसेन सरूर सामील झाला होता. त्याने या दहशतवादी गटाच्या हवाई संरक्षणात, अझीझ युनिटमध्ये आणि येमेनमध्ये हिजबुल्लाहचा संलग्नक म्हणून विविध पदे सांभाळली. युद्धादरम्यान त्याने इस्रायलवर असंख्य स्फोटक ड्रोन हल्ले केले, तसेच पाळत ठेवणारे ड्रोनही चालवत होता.

इस्रायल आणि गाझा पट्टीमधील हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्ध दरम्यान आता इस्रायलने लेबनॉनमधील दहशतवादी गट असलेल्या हिजबुल्लाह विरोधात युद्ध पुकारले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इस्रायलने हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना चांगलेच दणके दिले असून त्यांचे कंबरडे मोडले आहे. मंगळवारी पेजर ब्लास्ट, बुधवारी वॉकी-टॉकी ब्लास्ट, गुरुवारी एअर स्ट्राइक आणि शुक्रवारी परत एअर स्ट्राइक असे एकापाठोपाठ एक हल्ले करुन इस्रायलने हिजबुल्लाहची कोंडी करून टाकली होती. दरम्यान, इस्रायलच्या सैन्यदलाने शुक्रवारी बैरुतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख कमांडर इब्राहिम अकील ठार झाला होता.

हे ही वाचा : 

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला?, समितीचा अहवाल आला समोर!

आरोपीने पोलिसांवर गोळी झाडली तर आमचे पोलीस टाळ्या वाजवणार का?

हिमाचलचे मंत्री विक्रमादित्यांना काँग्रेसने फटकारले

संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन मंजूर

इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ११ महिन्यांहून अधिक काळ लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाह आणि इस्रायली सैन्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. या युद्धात सीमेच्या दोन्ही बाजूंनी हजारो लोक बेघर झाले आहेत.

Exit mobile version