कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर संकटाशी दोन हात करत असलेल्या भारताच्या मदतीसाठी अमेरिका धावून येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकारपरिषदेत तसे संकेत दिले आहेत. यापूर्वी अमेरिकेने भारताला कोविशील्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता अमेरिका भारताला थेट लसींचा पुरवठा करण्याच्या विचारात आहेत.
गेल्यावर्षी जगभरात कोरोनाची साथ आली तेव्हा अमेरिकेने लसनिर्मिती करणाऱ्या अनेक बड्या कंपन्यांशी करार करुन लसींचा मोठा साठा आपल्याकडे राहील, याची तजवीज केली होती. त्यानंतर आतापर्यंत अमेरिकेत बऱ्यापैकी लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे अमेरिका कोरोना लसींचा अतिरिक्त साठा इतर देशांना देण्याचा विचार करत आहे. यामध्ये अमेरिका भारताचा प्राधान्याने विचार करत असल्याचे समजते.
गेल्यावर्षी अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले होते तेव्हा भारतानेच अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध करुन दिला होता. त्या मदतीची आता अमेरिकेकडून परतफेड होण्याची शक्यता आहे. याशिवाय, अमेरिका भारताला रेमडेसिविरसह इतर औषधे आणि लसी तयार करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रांचे सुटे भागही देणार असल्याचे समजते.
हे ही वाचा:
ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन
ठाकरे सरकारचे माथाडी कामगारांकडे पूर्ण दुर्लक्ष- नरेंद्र पाटील
इस्राएलनंतर आता अमेरिकाही मास्क मुक्तीकडे?
इस्रायलनंतर अमेरिकेनेही मास्कमुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. देशात कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली आहे. ज्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे, तसेच ज्या लोकांपासून इतरांना संसर्गाचा धोका आहे, अशा लोकांसाठी अमेरिकेत प्राधान्याने कोरोना लसीकरण पूर्णत्वास नेले जात आहे.