केंद्र सरकारने तातडीने केलेली हालचाल आणि हवाई दलाने मध्यरात्री धावपळ करून गुजरातच्या मेहसाणातून सुटा भाग मागविल्यामुळे तळोज्यातील ऑक्सिजन प्लॅंटमधील तांत्रिक अडचण (स्पेअरपार्ट) दूर होऊन ऑक्सिजन निर्मिती अखंड सुरू राहिली. केंद्र सरकार, हवाई दल, गुजरातमधील अधिकारी आणि महाराष्ट्रातील विविध अधिकाऱ्यांच्या उत्तम समन्वयामुळे तळोज्यातील ऑक्सिजन प्लँटची ही अडचण दूर झाली.
हे ही वाचा:
इस्रायलने का केला मीडिया इमारतीवर हल्ला?
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
नवाब मलिकांनी गालावर माशी बसवावी, कोण जोरात मारतं याची स्पर्धा घ्यावी
नाना पटोलेंना समजावणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता
त्याचे झाले असे की, १० मे रोजी तळोज्यातील ऑक्सिजन प्लॅँटमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे ऑक्सिजननिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता होती. पण केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेला मदतीचा हात आणि १६ तास सातत्याने झटून ही ऑक्सिजन निर्मिती कुठेही खंडित होऊ नये याची घेतलेली काळजी घेण्यात आली.
तळोज्यातील लिंडे इंडिया या प्लँटमधून २४३ मेट्रिक टन ऑक्सिजनची रोज निर्मिती होत असून तो ऑक्सिजन राज्यातील रुग्णालयांना उपलब्ध करून दिला जात आहे.
या प्लँटमध्ये आवश्यक असलेला एक सुटा भाग ज्याची किंमत ५५ हजार रुपये आहे, त्याच्यातील दोषामुळे ही अडचण निर्माण झाली होती. हा सुटा भाग गुजरातच्या मेहसाणात तयार केला जातो. तो तयार करण्यासाठी २४ तासांचा अवधी लागणार होता. तो तयार करून भारतीय हवाई दलाच्या वेगवान हालचालींमुळे अहमदाबाद ते मुंबई असा प्रवास करून विमानाने आणला गेला.
१० मे रोजी लिंडे कंपनीकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना या अडचणीबाबत दुपारी सांगण्यात आले. हा सुटा भाग गुजरातच्या मेहसाणा येथे तयार केला जात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्या निर्मितीसाठी २४ तासांचा अवधीही लागणार होता. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मेहसाणाचे जिल्हाधिकारी एच.के. पटेल यांच्याशी संपर्क साधून हा सुटा भाग तातडीने बनविण्याची विनंती केली. पटेल यांनी तसे आदेश दिले. पण हा सुटा भाग मेहसाणाहून मुंबईत आणण्यास गाडीने ४८ ते ७२ तासांचा अवधी लागणार होता. सोमवारी १० मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता राज्य वाहतूक प्रमुख अविनाश ढाकणे यांना असे सांगण्यात आले की, तळोज्यात हा सुटा भाग वेळेत पोहोचला पाहिजे. लिंडे कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत मेहसाणात हा सुटा भाग तयार झालेला असेल. तातडीने संरक्षण खात्याच्या सहसचिवांना फोन करून ही बाब लक्षात आणून दिली गेली. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या तसेच हवाई दलाच्या मुख्यालयालाही या अडचणीविषयी सांगण्यात आले. त्यानंतर हालचाली अधिक तीव्र झाल्या आणि दिल्लीहून हवाई दलाचे विमान अहमदाबाद येथे रात्री पावणे नऊच्या सुमारास उतरले. मेहसाणाचे पोलिस अधीक्षक, अहमदाबादचे जिल्हाधिकारी, अहमदाबाद पोलिस यांच्या सहकार्याने तो सुटा भाग तातडीने विमानतळावर आणला गेला. त्या सुट्या भागाच्या निर्मितीनंतर त्यावर शेवटचा हात फिरवताना थोडा विलंब झाला पण तो भाग रात्री १२.४५च्या सुमारास विमानतळावर दाखल झाला. हवाई दलाच्या विमानाने तो सुटा भाग पहाटे ३.३० ला मुंबईत आला. तिथून तो भाग तासाभराने म्हणजे ४.३० वाजता तळोज्यात पोहोचला.
यासंदर्भात भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, एका स्पेअरपार्टमुळे तळोज्यातील लिंडे इंडियाची २४३ मे.टन ऑक्सिजननिर्मिती ठप्प होणार होती. मोठा पेच होता. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी विनंती केल्यामुळे एअरफोर्सने तातडीने झेप घेत वेळेत हा पार्ट पोहोचवला. कोरोनाकाळात केंद्र सरकार या तडफेने काम करते आहे आणि ठाकरे सरकार केवळ कांगावा करते आहे.