अमेरिकन फूड कंपनी हेन्झने मंगळ ग्रहासारख्या मातीत पिकवलेल्या टोमॅटोपासून नवीन ‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचप तयार केले आहे. मनुष्याला मंगळावर राहता येऊ शकेल का याच्या संशोधनाचा एक भाग म्हणून हा प्रयत्न करण्यात आला आहे.
पृथ्वीवरच्या मातीच्या तुलनेत मंगळ ग्रहावरची माती पिकांसाठी अधिक कठोर आहे. मंगळ ग्रहावरची माती मार्टियन रेगोलिथ म्हणून ओळखली जाते. त्या मातीत सेंद्रिय पदार्थ नसतात. तसेच मंगळावर सूर्यप्रकाशही कमी पोहोचतो. यामुळे, टोमॅटो पिकवणाऱ्या टीमने ते पीक घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधून त्याचा वापर केला आणि त्यात त्यांना यश आले आहे.
एक दिवस मानवाने मंगळावर स्वतः शेती करावी या दिशेने काम करणाऱ्या टीमने मंगळ ग्रहासारखे हरितगृह वातावरण तयार केले आणि मंगळासारखीच माती त्यासाठी वापरली. त्यांनी या पद्धतीने टोमॅटो उगवले आणि नंतर हेन्झने त्या टोमॅटोंचे केचप तयार केले.
हेन्झने तयार केलेल्या ‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचप चव साधारण टोमॅटो केचपपेक्षा वेगळी असल्याचे त्यात म्हटले आहे. हेन्झने मार्स व्हर्जन केचपची बाटली अंतराळातसुद्धा पाठवली होती, जिथे ही बाटली -९४ अंश तापमानात ठेवण्यात आली होती.
हे ही वाचा:
भोपाळमधील रुग्णालयाला आग; ४ बालकांचा मृत्यू
‘एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला’
नवाब मलिकांना न्यायालयाने झापले; ट्विटरवर उत्तरे देता, इथेही द्या!
‘अहमदनगरची दुर्घटना हे सरकारच्या निष्क्रियतेमुळे घडलेले हत्याकांड’
हेन्झमधील टोमॅटो मास्टर्सने मंगळावर भविष्यात जाणारे लोक त्या ग्रहाच्या मातीत टोमॅटो पिकवू शकतील का, त्याचे केचप बनवू शकतील की नाही, हे शोधण्यासाठी ही मोहीम सुरू केली होती. त्यासाठी उत्तम बियाणे घेण्यात आले आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची वाढ करण्यात आली.
हे टोमॅटो तयार करणाऱ्या टीमचे म्हणणे आहे की, पृथ्वीवरील वातावरणातील बदलामुळे शेती करणे कठीण होत चालले. नासाचे (NASA) माजी अंतराळवीर माईक मॅसिमिनो म्हणाले की, घरापासून (पृथ्वीपासून) इतके दूरवर पिकवलेल्या पदार्थाची चव परिचयाची असणे हे मानवाच्या कल्याणासाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी आवश्यक आहे.