भारतात उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानमध्येही मुसळधार पावसाने हाहाःकार माजवला आहे. पाकिस्तानमध्ये पावसामुळे भीषण संकट स्थिती उभी ठाकली आहे. यंदा पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या ८६ झाली असून १५१ जण जखमी झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. मृतांमध्ये १६ महिला आणि ३७ मुलांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे ९७ घरांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानमधील पंजाबमध्ये सर्वाधिक ५२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पाकिस्तानात २०२३ मध्ये भीषण पूर येण्याची ७२ टक्के शक्यता असल्याचा अंदाज आपत्कालीन व्यवस्थापनाने एप्रिलमध्ये व्यक्त केला होता. सध्या पाकिस्तानातील स्थितीवर १७ उपग्रह आणि ३६ पूर चेतावणी प्रणालींद्वारे लक्ष ठेवत जात आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या हवामान बदल मंत्रालयाने दिली आहे. गेल्या वर्षीही पाकिस्तानला जबरदस्त पुराचा तडाखा बसला होता. आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला गतवर्षी पुराच्या समस्येचाही सामना करावा लागला होता. या संकटात मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही पुराचा फटका पाकिस्तानला बसल्यास पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
हे ही वाचा:
२५ समोसे पडले १ लाख ४० हजारांना
उत्तर प्रदेशातील शाळा-कॉलेजची ‘सफाई’; व्यवस्थापकीय मंडळातून गुंड, माफिया बाहेर
कार्यालयात घुसून माजी कर्मचाऱ्याने आपल्या माजी ‘बॉस’ला तलवारीने केले ठार
उत्तर भारतातील धुवाँधार पाऊस हा हवामान बदलाचा परिणाम नव्हे!
मुसळधार पावसाचा भारताला फटका
भारतातही पावसामुळे भीषण परिस्थिती असून मुसळधार पावसाचा फटका उत्तरेकडील राज्यांना अधिक बसला आहे. देशात गेल्या २४ तासांत सात राज्यांमध्ये भूस्खलन आणि पुराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या सहा दिवसात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे.