इस्रायलचे संरक्षण दल अर्थात आयडीएफने गाझामध्ये हमासमधील एका गटाच्या अनेक दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे. या गटाचा ७ ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता. गुप्तचर संस्थेच्या निर्देशांनुसार, ही कारवाई करण्यात आल्याचे आयडीएफने सांगितले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये या गटाचा कमांडर अहमद मुसा आणि पश्चिम जबालियामधील एका दहशतवादी तुकडीचा कमांडर उमर अलहांडी यांचा समावेश आहे.
आयडीएफच्या एका तुकडीने अन्य एका मोहिमेत इस्रायली सैन्यावर हल्ला करण्याचा कट रचत असणाऱ्या १९ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी समुद्रकिनाऱ्यावरील एका कंटेनरवर बॉम्बवर्षाव करून त्याला नष्ट केले. या कंटेनरमध्ये २० रॉकेट लाँचर होते.
त्याचवेळी इस्रायलने उत्तर गाझा भागात हल्ल्याची तीव्रता वाढवल्याने हजारो नागरिक भीतीने पलायन करत आहेत. दोन दिवसांत एक लाखाहून अधिक नागरिक दक्षिण गाझाच्या दिशेने पळून गेले आहेत, असा दावा आयडीएफने केला. इस्रायलचे सैन्य गाझा शहरात घुसून कारवाई करत असल्याने या नागरिकांसमोर येथून पलायन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तर, गाझा पट्टीमध्ये ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका करण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.
गाझामधील रुग्णालयांवर हल्ले
इस्रायली सैन्यांनी गाझामधील सर्वांत मोठ्या अल शिफा रुग्णालयावर पाचवेळा बॉम्बहल्ले केले. त्यामध्ये एक ठार तर, अनेकजण जखमी झाले. रुग्णालयामधून रुग्णांना बाहेर काढण्याचा कोणताच मार्ग नाही. इन्क्युबेटरमध्ये असणारी ४५ तान्ही बाळे, आयसीयूमधील ५२ मुले, शेकडो जखमी आणि रुग्णांच्या जीवाला धोका असल्याचे गाझा आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अशरफ अल किद्रा यांनी सांगितले. आतापर्यंत या युद्धात ११ हजार ७८ पॅलिस्टिनी नागरिकांचा जीव गेला असल्याचे सांगितले जात आहे.