गाझा पट्टीमध्ये जमिनीवरून तीव्र आक्रमण करणाऱ्या इस्रायलच्या सुरक्षा दलाकडून हमासच्या भुयारांचे जाळे जमीनदोस्त केले जात आहे. या भुयारांमध्ये हमासचे दहशतवादी आणि इस्रायलच्या सैन्यांमधील युद्ध सुरू आहे. मंगळवारीदेखील या दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला. यात हमासचे ३०० तळ उद्ध्वस्त झाल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलाने केला आहे. या हल्ल्यांमध्ये हमासचा एक कमांडर मारला गेला असून अनेक अतिरेकीही मारले गेल्याचा दावा इस्रायल लष्कराने केला आहे. हमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्याला हा कमांडर जबाबदार होता असे सांगण्यात आले आहे.
या तळावर रणगाडेविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा, रॉकेट लाँच पोस्ट, सैन्य परिसर, शस्त्रास्त्रांचे आगार आदी होते. दहशतवाद्यांनी येथूनच गोळीबार करून क्षेपणास्त्र डागले. तर, इस्रायलने दिलेल्या प्रत्युत्तरात अनेक जण मारले गेले. मात्र नेमके किती दहशतवादी मारले गेले, हे समजू शकलेले नाही. इस्रायलने आपला जमिनीवरील लढा तीव्र करून भुयारांमधील तळे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. भुयारांमधूनच हमासचे दहशतवादी इस्रायलविरोधी कारवाया आणि हल्ले करत होते.
हे ही वाचा:
जाळपोळ करणाऱ्यांविरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याचे गुन्हे!
लिफ्टमध्ये कुत्र्यावरून वाद; निवृत्त आयएएस आणि दाम्पत्यात मारहाण
‘अन्यथा आम्ही निर्णय घेऊ…’चा नेमका अर्थ काय ?
‘वाघ, बिबळ्या, खवले मांजर, गेंड्यांच्या अवशेषांचा ८८ चिनी औषधांमध्ये वापर’
दोन्ही दिशांनी केला हल्ला
इस्रायलच्या सैन्याने उत्तर-पश्चिम गाझामध्ये हमासच्या तळांवर सोमवारी रात्रीपासून ते मंगळवार पहाटेपर्यंत हवा, समुद्र आणि जमिनीमार्गे हल्ले केले. येथे सैन्याने दोन दिशांनी हल्ले केले.
रुग्णालयामधील वीज खंडित
उत्तर गाझामधील इंडोनेशियाई रुग्णालयाबाहेर इस्रायलच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाला आहे. इंधन कमी असल्याने येथे दाखल असलेल्या २५० रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
संयुक्त राष्ट्राचा इशारा
गाझामधील सार्वजनिक आरोग्य सेवेची अतिशय दयनीय अवस्था झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. निर्जलीकरणामुळे लहान बाळांचे मृत्यू होण्याचा धोका आहे, असाही इशारा त्यांनी दिला. तसेच, गाझामध्ये जेवण मिळणे मुश्कील झाले असून आरोग्यसेवाही कोलमडली आहे. संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांच्या मदतकार्याशी निगडीत ६७ कर्मचारी आतापर्यंत मारले गेले आहेत.