गेल्या दोन दिवसांत गाझामध्ये शेकडो जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण परिषदेत आज, मंगळवारी युद्धविरामाच्या ठरावावर मतदान होणार आहे. तर, पॅलिस्टिनींचा गट असलेले हमासचे सैन्य उत्तर गाझामध्ये उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत, असे सांगून हमासचे अनेक सैनिक विशेषतः जबालिया आणि शेजालिया बटालियनचे सैनिक शरणागती पत्करत असल्याचा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांत इस्रायलने केलेले तीव्र बॉम्बहल्ले आणि जमिनीवरील कारवाई यामुळे गाझामधील शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. इस्रायली सैन्याने हमासला पराभूत करण्यासाठी आणखी काही महिने किंवा दीर्घकाळ लढण्याची आपली तयारी असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
तर, दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण परिषदेत मानवतावादी भूमिकेतून गाझामध्ये त्वरित युद्धविराम जाहीर करावा, या ठरावावर मंगळवारी मतदान होणार आहे. त्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण परिषदेने तातडीची बैठक बोलावली आहे. अरब गटातील २२ देश आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनच्या ५२ सदस्य देशांच्या विनंतीवरून हे मतदान घेतले जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मांडण्यात आलेला ठराव आणि मंगळवारी मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सारखाच आहे. मंगळवारच्या ठरावात अमेरिकेने नकाराधिकाराचा वापर केला होता.
‘ज्या आमच्याशी लढण्यासाठी वर्षानुवर्षे तयार होत्या, ज्यांना अजिंक्य मानले जात होते, अशा जबलिया आणि शेजैया… या बटालियनच्या शेवटच्या गडांना आम्ही वेढा घातला आहे. त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत,’ असा दावा संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी केला आहे.
हेही वाचा :
मध्य प्रदेशात भाजपाचे धक्कातंत्र; शिवराजसिंह चौहानांऐवजी मोहन यादवांची मुख्यमंत्रीपदी वर्णी
सर्वोच्च न्यायालयाच्या ३७० संबंधीच्या निर्णयाचा बॉलीवूडला आनंद
शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडा अन्यथा ठार करा!
पाकच्या बॉर्डरवर तेजस विमाने चुटकीसरशी पोहोचणार!
आतापर्यंत गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सुमारे १७ हजार पॅलिस्टिनी नागरिक मृत्यमुखी पडल्याची माहिती गाझातील आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.