आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासचा कमांडर खालेद मशाल याने भारतातील केरळच्या मलप्पुरम येथे व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी भाजपने पिनराई विजयन यांच्या सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष सुरू होऊन 3 आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. त्याचवेळी, हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल त्यांच्या स्थानांवर सातत्याने हवाई हल्ले करत आहे. इकडे भारतातही इस्रायलच्या समर्थनात आणि विरोधात लोक उभे राहिले आहेत. नुकतेच केरळमधील मलप्पुरम येथून एक वादग्रस्त प्रकरण समोर आले असून त्यात हमासच्या दहशतवाद्याने केरळच्या लोकांना व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संबोधित केले. त्याचवेळी भाजपने आता याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
हे ही वाचा:
‘पुन्हा येईन’ व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांची उडवली खिल्ली
गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त
‘मी टायगर नाही, मी राणे आहे’, निलेश राणे!
हमासचा दहशतवादी खालेद मशाल यांच्या भाषणानंतर भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. याप्रकरणी केरळ भाजपचे अध्यक्ष के सुरेंद्रन यांनी राज्यातील पिनाराई विजयन सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पिनाराई विजयनचे केरळ पोलीस कुठे आहेत असा सवाल करत त्यांनी ट्विटरवर (एक्स) चिंता व्यक्त केली. पॅलेस्टाईन वाचवण्याच्या नावाखाली दहशतवादी संघटना हमास आणि त्यांच्या दहशतवाद्यांचा योद्धा म्हणून गौरव केला जात आहे, हे कोणत्याही प्रकारे मान्य नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी सांगितले.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ल्यांमध्ये ७ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. त्याचबरोबर हमासच्या हल्ल्यात १४०० हून अधिक इस्रायली नागरिक मारले गेले आहेत.