इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदीचा करार झाला असून याअंतर्गत हमास कडून इस्रायली ओलिसांची सुटका केली जात आहे तर दुसरीकडे इस्रायलकडून पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जात आहे. दरम्यान, गुरुवारी पहाटे हमासने गाझामधील रेड क्रॉसला चार इस्रायली बंधकांचे मृतदेह सुपूर्द केल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेह हस्तांतरित करण्याच्या सुमारास, रेड क्रॉसचे एक पथक साधारण डझनभर सुटका झालेल्या पॅलेस्टिनी कैद्यांना घेऊन इस्रायलच्या ओफर तुरुंगातून निघाल्याचे वृत्त आहे.
हमासने यापूर्वी हे मृतदेह त्साची इदान, इत्झाक एल्गारत, ओहाद याहलोमी आणि श्लोमो मंत्झूर यांचे असल्याचे ओळखले होते, या सर्वांचे ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्यात अपहरण करण्यात आले होते. या हस्तांतरणामुळे युद्धबंदीच्या पहिल्या टप्प्यातील दोन्ही बाजूंच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. जवळजवळ २००० पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात आठ मृतदेहांसह ३३ ओलिसांना हमासने परत पाठवले आहे. युद्धबंदीचा सहा आठवड्यांचा पहिला टप्पा या आठवड्याच्या शेवटी संपत आहे.
हमासने बंधकांना ताब्यात घेतल्याच्या वेळी झालेल्या क्रूर वागणुकीचा निषेध करण्यासाठी इस्रायलने शनिवारपासून ६०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यास विलंब लावला आहे. या अतिरेकी गटाने या विलंबाला युद्धबंदीचे गंभीर उल्लंघन म्हटले आहे आणि पॅलेस्टिनींची सुटका होईपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील चर्चा शक्य नसल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा :
आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असलेला देश म्हणत भारताने पाकला सुनावले
महाकुंभाची महाशिवरात्रीच्या अमृत स्नानाने समाप्ती, ६६ कोटींहून अधिक भाविकांचे संगमात स्नान!
शशी थरूर म्हणाले, महादेवाच्या भाळावरील चंद्रकोरीवरून ‘शशी’ नाव ठेवले!
राहुल गांधी, उद्धव ठाकरे महाकुंभला गेले नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार टाका!
या महिन्याच्या सुरुवातीला, हमासने शिरी बिबास आणि तिचे मुलगे, ९ महिन्यांचे कफिर आणि ४ वर्षाचे एरियल यांचे मृतदेह सुपूर्द केले होते. गाझाच्या खान युनूसमध्ये मृतदेहांचे सार्वजनिक प्रदर्शन झाल्यानंतर हे हस्तांतरण करण्यात आले, या घटनेने इस्रायलमध्ये संताप व्यक्त करण्यात आला होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने यापूर्वी सांगितले होते की मृतदेहांचे हस्तांतरण समारंभाविना केले जाईल. रेड क्रॉस आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांसह इस्रायलने या समारंभांना ओलिसांसाठी अपमानजनक म्हटले आहे.