हमासने गुरुवारी (२० फेब्रुवारी) चार इस्रायली ओलिसांचे मृतदेह इस्रायलला सुपूर्द केले. यामध्ये शिरी बिबास नामक महिलेसह तिच्या दोन लहान मुलांचा समावेश होता. तर उर्वरित ८३ वर्षीय ओडेड लिफशिट्झचा मृतदेह आहे. ओलिसांचे मृतदेह परत आल्यानंतर इस्रायलमध्ये शोककळा पसरली. मात्र, या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे.
सांगितले जात आहे की, फॉरेन्सिक तपासानंतर मृतदेहांची ओळख पटवण्यात आली असून यामध्ये एक मृतदेह इस्रायली ओलीसाचा नसल्याचे समोर आले आहे. या खुलासानंतर इस्रायल आणि हमासमध्ये नवा विवाद निर्माण झाला आहे. इस्रायलने हमासवर युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
इस्रायली सैन्याने शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) दावा केला की, हमासने शिरी बिबास या महिलेचा मृतदेह परत केलेला नाही. त्याच्या जागी दुसऱ्या कोणाचा तरी मृतदेह सोपवण्यात आला आहे. दरम्यान, शिरी बिबास यांच्या दोन लहान मुलांची ओळख पटली असल्याचे इस्रायली सैन्याने सांगितले.
हे ही वाचा :
नर्मदा परिक्रमा करणाऱ्या महिला भाविकांवर कट्टरवाद्यांकडून थुंकण्याचा प्रकार!
बांगलादेशी घुसखोरांविरोधातील दादरमधील मूक निदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्तीसगढ: नक्षलवाद्यांकडून एका शिक्षकासह ग्रामस्थाची गळा दाबून हत्या!
एकनाथ शिंदेंच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून अटक
इस्रायली पोलिस आणि मुलांच्या कुटुंबियांच्या मदतीने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनने ‘एरियल’ आणि ‘केफिर’ बिबास या दोन मुलांचे मृतदेह ओळखले. फॉरेन्सिक अहवालानुसार, नोव्हेंबर २०२३ मध्ये हमासच्या कैदेत मुलांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
इस्रायली सैन्याने म्हटले आहे की असे करून हमासने ओलिसांच्या सुटकेच्या कराराचे उल्लंघन केले आहे. आम्ही हमासला शिरी बिबासचा मृतदेह परत करण्याची मागणी करतो. इस्रायलच्या या दाव्यावर हमासने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, या प्रकारानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आक्रोश व्यक्त करत हमासला उत्तर देण्यास सांगितले आणि इशारा दिला. ते म्हणाले, मृतदेह परत करणे हे हमासच्या धोक्याचे लक्षण आहे, याचा सर्व हिशोब चुकता केला जाईल आणि आम्ही करू.