‘हमास ही दहशतवादी संघटना पॅलेस्टिनी नागरिकांचे प्रतिनिधित्व करत नाहीत,’ असे वक्तव्य ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शुक्रवारी केले. त्यांनी इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांची इजिप्तच्या दौऱ्यात भेट घेतली. मध्यपूर्व दौऱ्याचा एक भाग म्हणून त्यांनी इजिप्तचा दौरा केला आणि इस्त्रायल-हमास युद्ध संपूर्ण प्रदेशात पसरू नये याबाबत चर्चा केली.
कैरोमध्ये सुनक यांनी इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली. तसेच, इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकांच्या समाधानासाठी ब्रिटन दीर्घकाळ कटिबद्ध राहील, या वचनाचा पुनरुच्चार केला.
या दोन्ही देशांचे नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी आणि निष्पाप जीवांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी पावले उचलली जातील, यावर सर्व राजकीय नेत्यांनी सहमती दर्शवली.
‘पंतप्रधान सुनक यांनी यांनी गाझामधील हजारो लोकांचे दुःख दूर करण्यासाठी, त्यांना अन्न, पाणी आणि औषधांची मानवतावादी मदत खुली करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले,’ अशी माहिती ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या प्रवक्त्याने दिली. सुनक यांनी हमासच्या दहशतवादाचा निषेध केला आणि हमास पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही, असेही सांगितले.
हे ही वाचा:
भारताची गगनभरारी; ‘गगनयान’ प्रो मॉड्यूलची चाचणी यशस्वी
वॉर्नर, मार्शच्या शतकांनी ऑस्ट्रेलियाला मिळवून दिला विजय
राजनैतिक अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईनंतर ट्रुडो पुन्हा बरळले
फडणवीसांनी बुरखा नव्हे; कपडेच फाडले!
भविष्यात जिथे इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिक शांततेने आणि सुरक्षेत नांदू शकतील, अशा द्वि-राष्ट्र तोडग्यासाठी ब्रिटन वचनबद्ध आहे, याचा पुनरुच्चार सुनक यांनी केला.
एल-सिसी यांच्यासोबतच्या त्यांच्या याआधीच्या चर्चेत, सुनक यांनी इजिप्त आणि गाझा दरम्यानची रफाह सीमा शक्य तितक्या लवकर पुन्हा सुरू करण्याच्या इजिप्तच्या प्रयत्नांचे स्वागत केले. गाझामधील नागरिकांना मदत करण्यासाठी आणि तेथील भीषण परिस्थिती कमी करण्यासाठी ब्रिटन आपली भूमिका बजावण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही सुनक यांनी स्पष्ट केले.