हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) शेवटच्या दोन एसयु-३० ची बांधणी पूर्ण करून २७२ विमानांची मागणी पूर्ण केली आहे. ही दोन विमाने लवकरच हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होतील.
“यापैकी एक विमान ब्रम्होस क्षेपणास्त्र प्रणालीसाठी प्रमाणित करून रुजू करण्यात आले आहे. अजून एक विमान बांधून तयार असून फेब्रुवारी महिन्यात त्यालाही प्रमाणित करण्यात येईल.” अशी माहिती एचएएलच्या अधिकाऱ्याने दिली. या विमानांच्या खरेदीची प्रक्रिया चालू आहे.
भारताने रशियासोबत एसयु-३० खरेदी करण्याचा करार केला होता. त्यापैकी २२२ एसयु-३० विमाने नाशिक येथील एचएएलच्या काखान्यात तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या तत्त्वानुसार बांधली जाणार होती. एकूण २७२ विमानांपैकी ४० विमानांना ब्राम्होस क्षेपणास्त्र प्रणालीसाठी अद्ययावत करण्यात आले. भारतीय हवाई दलाला विमाने मिळण्यास सुरूवात झाली असून, हवाईदलाने काही विमाने तंजावर, तमिळनाडू येथे तैनात केली आहेत.
एचएएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांनी दिलेल्या माहितीनुसार हा एचएएलचा शेवटचा सर्वात मोठा तंत्रज्ञान हस्तांतरणाचा प्रकल्प होता. एचएएलने ब्रिटिश हॉक ऍडव्हान्स्ड जेट ट्रेनरच्या (एजेटी) संपूर्ण प्रारूपाचे काम केले असून त्याच्या उत्पादनाची भारताला परवानगी मिळाली आहे.
मागिल जुलै महिन्यात डिफेन्स ऍक्विझिशन कौन्सिलने (डीएसी) १२ एसयु-३०एमकेआय या विमानांच्या उत्पादनाची परवानगी रशियाकडून खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी रशियाने जास्त किंमत आकारल्याने वाटाघाटी चालू आहेत. ही विमाने कालौघात नष्ट झालेल्या एसयु-३०ची जागा घेतील.