भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाच्या संयुक्त मोहिमेत भारतीय सीमाक्षेत्रात प्रवेश करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या तस्कारांकडे अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे सापडली आहेत.
सुरक्षा यंत्रणांना यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर २५ आणि २६ डिसेंबरच्या रात्री काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. त्यामुळे भारतीय तटरक्षक दल आणि दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई केली. त्यात या संशयास्पद बोटीला घेरण्यात आले. भारताच्या दिशेने येणारी एक नाव या सुरक्षा यंत्रणांच्या टप्प्यात आली. तेव्हा त्या बोटीला थांबविण्यास सांगण्यात आले पण त्या बोटीने दुसरी दिशा पकडत पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तटरक्षक दलाच्या अरिंजय या बोटीने या बोटीला घेरले. या बोटीचे नाव अल सोहेली आहे. त्यावर हे तस्कर होते. त्यांच्याकडे ४० किलो मादक पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा होता. त्या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत त्यांचे मूल्य ३०० कोटी रुपये असल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
भातखळकरांची टीका; राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधकांचा खेळ
राहुल गांधींना ‘तपस्वी’ जाहीर करण्यासाठी काँग्रेसचा आटापिटा; प्रभू श्रीरामाशीही तुलना
मुलींचे रक्षण करा, त्यांना योग्य संस्कार शिकवा!
पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने या दीडवर्षात केलेली ही सातवी कारवाई आहे. त्यात आतापर्यंत ४४ पाकिस्तानी, ७ इराणी तस्करांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत ४३६ किलो हेरॉइन जप्त केले गेले आहे. त्या सगळ्या अमली पदार्थांचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १९३० कोटी इतके आहे.