राजनाथ सिंह यांची थट्टा; पण ग्रीस धर्मगुरुंनी केलेली राफेलची पूजा कौतुकास पात्र?

राजनाथ सिंह यांची थट्टा; पण ग्रीस धर्मगुरुंनी केलेली राफेलची पूजा कौतुकास पात्र?

मागे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून भारताने खरेदी केलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या नव्या ताफ्याची पूजा केल्यावरून बराच वादंग माजला होता. राजनाथ सिंह यांच्या त्या शस्त्रपूजनाची बरीच खिल्ली उडविली गेली. आता याच फ्रान्सने ग्रीसला चार राफेल विमानाचा संच दिला आहे. त्या ताफ्याची ग्रीक धर्मगुरुंनी पूजा केल्याचा व्हीडिओ व्हायरल होतो आहे. त्यात ते धर्मगुरू मंत्र म्हणत त्या विमानांची पूजा करतात आणि नंतर त्या विमानांच्या पायलट्सलाही आशीर्वाद देतात. ते पायलटही त्यांच्यापुढे झुकून त्यांना वंदन करतात.

त्यामुळे एकीकडे भारताच्या शस्त्रपूजनाच्या परंपरेची खिल्ली उडविणारे आता ग्रीसच्या या पारंपरिक पूजापद्धतीबद्दल काही बोलणार आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.

या व्हीडिओत हे दिसून येते की, दोन धर्मगुरू त्यांच्या पारंपरिक वेषात विमानतळावर येतात आणि पाणी शिंपडून त्या पायलट्सना आशीर्वाद देतात, तेच पाणी ते विमानांवरही शिंपडतात. त्या विमानतळावर अनेक लोक हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असल्याचेही दिसते. ते पायलट्स धर्मगुरूंच्या हाताचे चुंबन घेतात तेव्हा हे धर्मगुरू आपल्याकडील पवित्र पाणी त्यांच्या डोक्यावर शिंपडतात.

राजनाथ सिंह यांच्या त्या शस्त्रपूजेची थट्टा करणारे यावर मात्र व्यक्त झालेले नाहीत. त्यामुळे या निमित्ताने हा ढोंगीपणा उघड झाला आहे.

राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये ३६ राफेल विमानांचा ताफा भारताला देण्यात आला तेव्हा त्या विमानांची पूजा केली होती. टिळा लावून, फुले वाहिली होती. त्यावेळी काँग्रेसचे संसदेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी याला तमाशा असे संबोधले होते. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांची तुलना आपल्या गाडीच्या रक्षणासाठी लिंबू मिरची अडकवणाऱ्या ट्रक चालकाशी केली होती.

आज मात्र ग्रीकसारखा देशही विमानांचा हा ताफा घेताना त्याची विधिवत पूजा करून त्या ताफ्याचे देशात स्वागत करताना दिसतो तेव्हा भारतातील तथाकथित पुरोगामीपणाचा हा ढोंगी चेहरा टराटरा फाटताना दिसतो आहे, असे मत व्यक्त होऊ लागले आहे.

Exit mobile version