स्वागत!! ऑलिम्पिकवीरांनी क्रिकेटपटूंना टाकले मागे

स्वागत!! ऑलिम्पिकवीरांनी क्रिकेटपटूंना टाकले मागे

एरवी क्रिकेट संघ बसमधून येणार म्हटले की प्रचंड गर्दी करणारे क्रीडारसिक आता अन्य खेळांतील खेळाडूंच्या कौतुकासाठीही गर्दी करू लागले आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकून आलेल्या किंवा तिथे दमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना पाहायला, त्यांची छायाचित्रे घ्यायला, त्यांच्यासाठी घोषणा द्यायला सोमवारी गर्दी लोटली. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू भारतात परतल्यावर त्यांचे जोरदार स्वागत होते आहे.

भारताचा सुवर्णविजेता नीरज चोप्रा याला तर त्याच्या गाडीपर्यंत पोहोचणेही मुश्कील झाले होते. विमानतळाहून बाहेर पडल्यानंतर गाडीपर्यंत जाता जाता त्याच्या नाकीनऊ आले. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही कोणतेही निर्बंध न पाळता लोकांनी नीरज चोप्राला पाहण्यासाठी गर्दी केली. शेवटी कसेबसे त्याच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी, मित्रांनी त्याला गाडीपर्यंत पोहोचविले.

भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाचेही उत्स्फूर्त स्वागत झाले. या दोन्ही संघांच्या बसेसभोवती क्रीडाचाहत्यांचा गराडा पडला होता. बसमधून बाहेर अभिमानाने पाहणारे खेळाडू आणि त्यांची झलक पाहण्यासाठी बाहेर जमलेली प्रचंड गर्दी असा माहोल ठिकठिकाणी पाहायला मिळाला. ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणारी मीराबाई चानू भारतात आल्यानंतर तिचेही विमानतळावर प्रचंड स्वागत झाले होते.

हे ही वाचा:
ऑगस्ट क्रांतिदिनी काँग्रेस नेत्याच्या फेसबुकवर ‘कांती’च्या मशाली

किल्ल्यांच्या संवर्धनापेक्षा महसुलाच्या ‘किल्ल्यां’कडे लक्ष?

महारेराच्या काळ्या यादीत राज्यातील १ हजार १८० प्रकल्प

चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?

रौप्यविजेता कुस्तीगीर रवीकुमार दहिया याचेही उत्स्फूर्त स्वागत झाले. उघड्या गाडीतून तो आपल्या घराकडे जात होता. त्याच्या गळ्यात हार घालण्यात आले होते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्याच्या गाडीवर चढून प्रतिक्रिया घेण्यात मश्गुल होते. लोकांकडून त्याचा जयघोष सुरू होता.

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत या ऑलिम्पिकवीरांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला.

Exit mobile version