पाकिस्तानच्या आर्थिक रसदीवर पोसल्या गेलेल्या आणि भारताविरुद्ध पद्धतशीर अपप्रचार करणाऱ्या यूट्यूब चॅनल्स आणि वेबसाईट्स विरोधात भारत सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. भारत विरोधी खोट्या बातम्या पसरवणाऱ्या तब्बल ३५ युट्युब आधारित वृत्तवाहिन्या आणि दोन संकेतस्थळांना ब्लॉक करण्याचे आदेश भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केलेल्या या यूट्यूब खात्यांची एकूण सदस्य संख्या १ कोटी २० लाखांहून अधिक आहे आणि त्यांच्या व्हिडिओजना १३० कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. या व्यतिरिक्त, इंटरनेटवर भारतविरोधी चुकीची माहिती पसरवण्यात समन्वित सहभागाबद्दल दोन ट्विटर खाती, दोन इंस्टाग्राम खाती आणि एक फेसबुक खातेदेखील भारत सरकारने ब्लॉक केले आहे.
हे ही वाचा:
‘विहंग गार्डन दंडमाफी बेकायदेशीर, घटनाविरोधी’
कमला इमारत अग्नितांडवात ७ जणांचा मृत्यू; १८ जण जखमी
मुंबईतील भाटिया रूग्णालयाजवळील इमारतीला भीषण आग; १५ जखमी
एन्काउंटर स्पेशालिस्ट ए ए खान यांचे निधन
माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, २०२१ च्या नियम १६ अंतर्गत जारी केलेल्या पाच स्वतंत्र आदेशांनुसार, मंत्रालयाने ही पाकिस्तान स्थित सोशल मीडिया खाती आणि संकेतस्थळे ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय गुप्तचर संस्था या सोशल मीडिया अकाऊंट्स आणि वेबसाइट्सवर बारकाईने लक्ष ठेवून होत्या आणि त्यांनी तात्काळ कारवाईसाठी ती चिन्हांकित केली होती.
केंद्र सरकारने कारवाई केलेली ही सर्व ३५ खाती पाकिस्तानातून कार्यरत होती आणि चार समन्वयित अपप्रचार नेटवर्क्सचा भाग होती. ही सर्व नेटवर्क्स खोटी वृत्त पेरून भारतीय प्रेक्षकांची दिशाभूल करणे या एकाच ध्येयाने चालवली जात होती. या सर्व वाहिन्या कॉमन हॅशटॅग आणि समान संपादन शैली वापरत होत्या. त्या सामान्य व्यक्तींद्वारे संचालित होत्या आणि एकमेकांच्या सामग्रीचा प्रचार करत होत्या. काही यूट्यूब वाहिन्या पाकिस्तानी टीव्ही वृत्तवाहिन्यांचे निवेदक चालवत होते.