२१०० पर्यंत समुद्राच्या पातळीत १५ टक्क्यांची वाढ
जर हरित वायू उत्सर्जन याच प्रमाणात चालू राहिले तर २१०० पर्यंत समुद्राच्या पातळीत १५ इंचांची वाढ होणार आहे असे नुकत्याच केल्या गेलेल्या अभ्यासातून उघड झाले आहे.
विविध मानवी कार्यांमुळे हरित वायूंचे उत्सर्जन होते. कार्बन डाय ऑक्साईड सारख्या हरित वायूंच्या उत्सर्जनामुळे जागतिक तापमानवाढ होत आहे. पर्यावरण क्षेत्रातील ६० विविध शास्त्रज्ञांनी एकत्रीतरित्या केलेल्या अभ्यासानुसार, जागतिक तापमानवाढीमुळे अंटार्क्टिका आणि आर्क्टिक क्षेत्रावरील बर्फ वितळून त्याचा थेट परिणाम समुद्राच्या वाढत्या पातळीत दिसणार आहे.
या प्रकल्पाचे प्रमुख आणि बर्फ या विषयातील तज्ञ सोफी नोविकी यांनी सांगितले की, या तापमानवाढीमुळे नेमके किती बर्फ वितळून, त्याचा नक्की कसा परिणाम होईल हे सांगणे अवघड आहे. मात्र त्याचा परिणाम कसा होईल हे आपण जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करतो त्यावर अवलंबून राहिल.
नासा गॉडार्डच्या नेतृत्त्वाखाली (आईस शिट मॉडेल इंटरकंपॅरिजन प्रोजेक्ट आयएसएमपी६) या प्रकल्पांतर्गत हा अभ्यास केला गेला होता. या अभ्यासानुसार सध्याच्या गतीने हरित वायू उत्सर्जन चालू राहिले तर २०१५-२१०० या कालावधीत ग्रीनलॅंडमधून वितळणाऱ्या बर्फामुळे समुद्राच्या पातळीत ३.५ इंचांची वाढ होईल.