शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज तिथीनुसार जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने पुण्यात एका नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी, अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील बाबासाहेब पुरंदरे यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या.
या दिग्गजांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भारतरत्न सचिन तेंडुलकर, सरसंघचालक मोहन भागवत, माजी लोकसभा अध्यक्षा आणि बाबासाहेब पुरंदरे सत्कार समितीच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन इत्यादी मान्यवरांचा समावेश आहे.
आपल्या भाषणाला पंतप्रधानांनी मराठीतून प्रारंभ केला. त्यांनी बाबासाहेबांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला. शिवाजी महाराजांच्या शिकवणीचे आचरण करण्याची शक्ती यावी अशी प्रार्थना देखील त्यांनी केली. पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांना १०० व्या वर्षांतील पदार्पणासाठी शुभेच्छा देखील दिल्या. त्याबरोबरच त्यांनी यापुढेही बाबासाहेबांचा आशीर्वाद मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मोदींनी यावेळी बोलताना सांगितले की शतायु आयुष्याची कल्पना ही अतिशय सकारात्मक कल्पना असल्याचे सांगितले. बाबासाहेब पुरंदरे यांचे आयुष्य या सकारात्मक विचाराचा आदर्श असल्याचे सांगितले. बाबासाहेबांची शंभरी आणि स्वातंत्र्याची ७५ वर्षे हा सुखद संयोग असल्याचे सांगितले.
या निमित्ताने देशात अनेक स्वातंत्र्यवीरांचा इतिहास लिहीण्याचा संकल्प केला गेला आहे. मात्र बाबासाहेब पुरंदरे हे काम गेली कित्येक दशके करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यांनी बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कित्येक वर्षांपूर्वी मोदी अहमदाबादमध्ये बाबासाहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असल्याची आठवण देखील त्यांनी यावेळी सांगितली तसेच जाणता राजाच्या कार्यक्रमासाठी खास पुण्याला आल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला.
भाषणाच्या अखेरीस मोदींनी देशातील युवा इतिहासकारांना बाबासाहेबांपासून प्रेरणा घेण्याचा सल्ला देखील दिला. इतिहास लिहीताना प्रेरणा आणि प्रामाणिकपणा बाबासाहेबांसारखा ठेवण्याविषयी त्यांनी युवकांना यावेळी सांगितले. त्याबरोबरच त्यांनी बाबासाहेबांच्या गोवा मुक्तीसंग्रामातील आणि दादरा नगरहवेली मुक्तीसंग्रामातील सहभागाचा देखील उल्लेख केला. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचे देशासमोर ठेवलेले आदर्श लोकांना पुढे कित्येक शतके प्रेरणा देत राहतील अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.