भारताच्या दौऱ्यावर आलेल्या जर्मनीतील मंत्र्यांनी भारतात भाज्यांची खरेदी केली आणि त्याचे पैसे ‘यूपीआय’ पेमेंट ऍपद्वारे केले. हा अनुभव त्यांना खूपच आवडला. भारताच्या जर्मन दूतावासाने ट्विटरवर याचा व्हिडीओ आणि छायाचित्र पोस्ट केले आहे. तसेच, भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांचे कौतुक केले आहे. जर्मनीचे डिजिटल आणि परिवहन मंत्री वोल्कर विजिंग सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. विजिंग १९ ऑगस्ट रोजी जी-२० देशांच्या डिजिटल मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बेंगळुरूला आले होते.
हे ही वाचा:
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान !
संजय राऊत म्हणतात पक्षाने आदेश दिला तर तुरुंगातही जातो, तर निवडणूकही लढू
तिकीट विक्री, वाढलेले हॉटेलचे दर, विमानांचे भाडे यावरून चाहते नाराज !
समान नागरी कायद्यातील ही एक दुर्लक्षित घटनात्मक तरतूद
भारतातील जर्मन दूतावासाने विजिंग यांचे व्हिडीओ आणि छायाचित्रे जाहीर केली आहेत. या व्हिडीओत ते भाज्या खरेदी करताना दिसत आहेत. तसेच, पैसे देताना यूपीआय ऍपचा वापर करताना दिसत आहेत. ‘भारताच्या यशस्वी कामगिरीपैकी एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे. यूपीआयमुळे प्रत्येकजण एका सेकंदात पैशांच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारात सक्षम होतो. लाखो भारतीय याचा वापर करतात. डिजिटल आणि परिवहन मंत्री विजिंग यांनी यूपीआयद्वारे होत असलेला सोपा व्यवहार जाणून घेतला. हे पाहून ते खूपच प्रभावित झाले,’ असे या पोस्टखाली जर्मन दूतावासाने नमूद केले आहे.
या पोस्टवर भारतीयांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारताला डिजिटल आर्थिक क्रांतीचा भाग संबोधल्याबद्दल आभारही मानले आहेत. तसेच, काहींनी जर्मनीमध्ये अशाप्रकारे पेमेंटची सुविधा कधी मिळणार?, असा प्रश्नही विचारला आहे. आतापर्यंत भारताने श्रीलंका, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात आणि सिंगापूर या देशांशी फिनटेक आणि उगवत्या पेमेंट पर्यायांवर भारतासोबत भागिदारी केली आहे. याआधी जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि फ्रान्स यांच्यात यूपीआय पेमेंटचा यंत्रणेचा वापर करण्यास सहमती झाल्याचे जाहीर केले होते.