बाली, इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या जी २० शिखर परिषदेचा आज शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भेटणार आहेत. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान सोमवारी रात्री येथे पोहोचले. मोदींनी येथे अनेक सभा घेतल्या. परिषदेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी भाषण केले. भू-राजकीय तणाव, आर्थिक मंदी आणि ऊर्जेच्या वाढत्या किमती आणि साथीच्या रोगाचे दुष्परिणाम या सर्वांमुळे जग एकमेकांशी झुंजत असताना भारत जी २० ची जबाबदारी घेत आहे. जग आशेच्या नजरेने जी २० कडे पाहत आहे असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले
जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या वर्षातील आमची तिसरी बैठक आहे. आम्ही दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध मजबूत करणे, संरक्षण सहकार्य वाढवणे आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. जी २० शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही आमच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये सभा आयोजित करू. आमच्या पाहुण्यांना भारतातील विविधता, सर्वसमावेशक परंपरा आणि सांस्कृतिक समृद्धीचा पूर्णपणे अनुभव घेता येईल.
पंतप्रधानांनी जी २० शिखर परिषदेत डिजिटल परिवर्तनाच्या तिसऱ्या टप्प्याला संबोधित केले. मोदी म्हणाले की, गेल्या काही वर्षांच्या भारताच्या अनुभवाने आम्हाला हे दाखवून दिले आहे की जर आपण डिजिटल आर्किटेक्चरला सर्वसमावेशक बनवले तर त्यातून सामाजिक-आर्थिक परिवर्तन होऊ शकते. मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी भारतातील ४० % पेक्षा जास्त रिअल टाइम पेमेंट यूपीआयद्वारे करण्यात आले होते. त्याचप्रमाणे, भारत आज आर्थिक समावेशात पुढे गेला आहे.डिजिटल परिवर्तनाचे फायदे केवळ मानवजातीच्या एका छोट्या भागापुरते मर्यादित नाहीत हे पाहण्याची जबाबदारी आमच्या जी २० नेत्यांची आहे.
हे ही वाचा:
समाजवादीचे नेते अबू आझमी आयकर विभागाच्या रडारवर
१५ दिवसांपूर्वीच आफताबचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले होते
ठाकरे गटाला धक्का! निवडणूक आयोगाविरोधातील याचिका फेटाळली
विनयभंगप्रकरणी आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर
मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बाली येथे जी २० शिखर परिषदेच्या निमित्ताने चर्चा केली. त्यांच्यात विविध विषयांवर फलदायी चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी संरक्षण संबंध कसे वाढवायचे, शाश्वत विकास आणि आर्थिक सहकार्य कसे वाढवायचे यावर चर्चा केली.
१ डिसेंबरपासून भारता कडे अध्यक्षपद
१ डिसेंबरपासून भारत अधिकृतपणे जी २० चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी शिखर परिषदेच्या समारोप समारंभात भारताला जी २० चे अध्यक्षपद सुपूर्द केले.