मालदीवचे मंत्री आणि नेत्यांच्या अवमानकारक वक्तव्याचा खुद्द मालदीवमधील स्थानिक, वरिष्ठ राजकीय नेते, राजकीय पक्षांनी कठोर शब्दांत विरोध केला आहे. सत्ताधारी नॅशनल पार्टीनेही अधिकृत निवेदन जाहीर करून मंत्र्यांच्या वंशवादी आणि आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला आहे. अशी वक्तव्ये स्वीकारली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे असे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पक्षाने सरकारकडे केली आहे.
मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलह यांनीही या वक्तव्याचा निषेध केला आहे. ‘भारताच्या विरोधातील मालदीव सरकारच्या प्रतिनिधींच्या सोशल मीडियावरील द्वेषपूर्ण भाषेचा आम्ही निषेध करत आहोत. भारत नेहमीच आपला चांगला मित्र राहिला आहे. आपण अशा प्रकारे वक्तव्याचे समर्थन करता कामा नये. अशा तऱ्हेने दोन्ही देशांच्या जुन्या मैत्रीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो,’ अशी भीती सोलह यांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, ‘भारतीयांनी जर मालदीववर बहिष्कार टाकला तर, आपल्या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होईल,’ अशी चिंता माजी क्रीडा मंत्री अहमद महलूफ यांनी व्यक्त केली.
माजी उपराष्ट्रपती अहमद आदिब यांनीही मंत्र्यांच्या या वंशवादी टिप्पण्यांचा निषेध केला. तर, माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी अशी आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मंत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. मालदीवचे खासदार अब्दुला यांनी याबाबत भारतीयांची माफी मागितली आणि मंत्र्यांनी केलेली वक्तव्ये हे मालदीवच्या सर्वसामान्य नागरिकांचे विचार नाहीत, अशी स्पष्टोक्ती केली.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारे मालदीवचे तीन मंत्री निलंबित
अफगाणिस्तान सिरीजमधून पंड्या, सुर्यकुमार आऊट
बोरिवलीत शस्त्रसाठ्यासह सापडले ६ संशयित!
उत्तर प्रदेशातील २५० वर्षे जुन्या मशिदीमध्ये ‘अजान’ देणार्या व्यक्तीला अटक!
मालदीव रिफॉर्म मुव्हमेंटचे अध्यक्ष फारिस मौमून यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. ‘अशा टिप्पणीमुळे भारत आणि मालदीवदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत मालदीवच्या नागरिकांवर विपरित परिणाम होईल. जे मालदीवचे नागरिक भारतात राहात आहेत आणि तिथे शिक्षण घेत आहेत, त्यांच्यावर मोठा परिणाम होईल,’ असे ते म्हणाले.