बांगलादेशच्या दिनाजपूर जिल्ह्यातील भावेश चंद्र रॉय या हिंदू नेत्याचे त्यांच्या घरातून अपहरण करून त्यांना मारहाण करून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेची नोंद भारताने घेतली असून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, हिंदू नेत्याची हत्या ही बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या काळात हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या मालिकेचा भाग असल्याचे दिसून येते.
“बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक नेते भावेश चंद्र रॉय यांचे अपहरण आणि क्रूर हत्येच्या दुःखद घटनेची नोंद आहे. ही घटना बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या मालिकेचा भाग असल्याचे दिसून येते, तर जुन्या प्रकरणांचे गुन्हेगार अजूनही मुक्तपणे फिरत आहेत. आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि पुन्हा एकदा अंतरिम सरकारला आठवण करून देतो की त्यांनी कोणत्याही सबबी न सांगता किंवा भेदभाव न करता हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे.
भावेश चंद्र रॉय हे बांगलादेश पूजा उत्सव परिषदेच्या बिरल युनिटचे उपाध्यक्ष आणि परिसरातील हिंदू समुदायाचे एक प्रमुख नेते होते. ढाक्यापासून सुमारे ३३० किमी वायव्येस असलेल्या दिनाजपूरमधील बासुदेवपूर गावातील रहिवासी ५८ वर्षीय भावेश चंद्र रॉय यांचे दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी त्यांच्या घरातून अपहरण केले आणि त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेश चंद्र रॉय यांचे अपहरण झाल्यानंतर काही तासांत त्यांचा मृतदेह सापडला.
हे ही वाचा..
राज ठाकरेंच्या युतीच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर काय म्हणाले राज ठाकरे?
संग्राम थोपटेंनी सोडला काँग्रेसचा ‘हात’! भाजपमध्ये करणार प्रवेश?
“बांगलादेशला जाण्यापूर्वी पुनर्विचार करा!” ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन नागरिकांना का दिला इशारा?
भावेश चंद्र रॉय यांच्या पत्नी शांतना यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी भावेश हे घरी असताना संध्याकाळी ४.३० च्या सुमारास त्यांना एक फोन आला. भावेश घरी आहेत की नाही? याची खात्री करून घेण्यासाठी हा फोन आल्याचे शांतना यांचा दावा आहे. यानंतर आलेल्या चार जणांनी भावेश याला घरातून बाहेर नेले. भावेश याला शेजारच्या गावात घेऊन गेले. तिथे निदर्यतेने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर एका व्हॅनमधून आले आणि त्यांनी भावेश यांना घराजवळ फेकून दिलं. कुटुंबियांना याची माहिती मिळताच त्यांनी भावेश यांना रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी भावेश यांना मृत घोषित केलं.