फ्रान्सने देशभरात मुस्लिम फुटीरतावादाच्या विरोधात चालवलेल्या मोहिमे अंतर्गत नऊ मशिदींना टाळे ठोकल्याची माहिती फ्रान्सचे अंतर्गत सुरक्षा मंत्री जेराल्ड डारमानिन यांनी दिली आहे.
हे ही वाचा: धार्मिक कट्टरतावादावर फ्रान्सचा पलटवार
“फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी आणि पंतप्रधानांनी दिलेल्या आज्ञेनुसार आम्ही इस्लामी फुटीरतावादाविरोधात निर्णायक पावले टाकत आहोत. आमची नजर असलेल्या १८ पैकी ९ मशिदींनी आम्ही बंद केले आहे.” असे ट्वीट फ्रान्सच्या मंत्र्यांनी केले आहे.
‘फिगारो’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार बंद करण्यात आलेल्या संस्थांपैकी तीन सैन-सेंट-डेनिस या पॅरिस नजीकच्या विभागात स्थित आहेत.
सॅम्युएल पॅटी या इतिहास शिक्षकाच्या निघृण हत्येनंतर फ्रान्स सरकारने मुस्लिम कट्टरतावादाच्या विरोधातील आपली मोहिम तीव्र केली. सॅम्युएल पॅटी यांनी वर्गात चार्ली हेब्दो या नियतकालीकात प्रसिद्ध झालेले प्रेषित महंमदाचे व्यंगचित्र दाखवल्याने त्यांची शिरच्छेद करून हत्या करण्यात आली होती. हेच व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याने २०१५ मध्ये नियतकालीकाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर २०२० मध्ये देखील पुन्हा एकदा चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता.
गेल्या काही काळात फ्रान्समध्ये मध्यपूर्वेतून मोठ्या प्रमाणात मुस्लिम निर्वासित स्थायिक झाले आहेत. मागील काही वर्षे फ्रान्स मुस्लिम कट्टरतावादाचे हल्ले अनुभवत आहे. सॅम्युएल पॅटी या शिक्षकाच्या हत्येने फ्रान्सच्या सहनशीलतेची परिसीमा पाहिली असून, फ्रान्स सरकारने आता मुस्लिम कट्टरतावादावर कडक प्रहार करण्यास सुरूवात केली आहे.