फ्रान्सने वाचवले २१ भारतीय नागरीक

फ्रान्सने वाचवले २१ भारतीय नागरीक

अफगाणिस्तानात तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर अनेक देशांनी त्यांचे दुतावास रिकामे करायला सुरूवात केली आहे. अनेक देशांनी त्यांच्या नागरीकांना सुरक्षितरित्या अफगाणिस्तानातून सोडवण्यास देखील सुरूवात केली आहे. या दरम्यान फ्रान्सने आपला दुतावास रिकामा करताना, त्याचे संरक्षण करणाऱ्या २१ गुरख्यांना देखील अफगाणिस्तानातून सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे.

भारतातील फ्रान्सचे राजदूत इम्यानुएल लेनाईन यांनी ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, काबूलहून उडालेल्या पहिल्या फ्रेंच विमानामध्ये २१ भारतीय नागरीकांचा देखील समावेश आहे. त्यांत, गुरख्यांचा समावेश आहे, जे फ्रेंच दुतावासाचे संरक्षण करत होते. त्याबरोबर फ्रेंच अधिकारी भारतीय अधिकाऱ्यांशी अफगाणिस्तानातील परिस्थितीविषयी सातत्याने संपर्कात आहेत.

हे ही वाचा:

अश्रफ घनी ‘या’ देशात पळाले

तालिबानने कब्जा केल्यामुळे भारतातला सुकामेवा महाग होणार?

शिवसेनेचे नारायण राणेंविरोधात सुडाचे राजकारण

तालिबानला पोसणाऱ्या देशांनाच तालिबानचा धोका?

एका बाजूला फ्रान्सने दुतावासाचे संरक्षण करणाऱ्या गुरख्यांना आपल्यासोबत वाचवले तर, कॅनडाने त्यांच्या दुतावासाचे संरक्षण करणाऱ्या गुरख्यांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचे दिसून आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ते गुरखे भारतीय अथवा नेपाळी नागरीक असल्याचे कारण पुढे करत, ते विशेष व्हिसा प्राप्तीसाठी पात्र नसल्याचे सांगितले. परंतु नंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे ट्वीट करण्यात आले.

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसें दिवस बिकट होत चालली आहे. काबुल तालिबान्यांच्या हाती पडल्यानंतर तिथे अराजक निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानातून अनेक लोक स्थलांतराचा प्रयत्न करताना त्यांच्या प्राणांना मुकले असल्याचे समोर आले आहे.

Exit mobile version