सीरियातून आलेल्या भारतीयांनी मानले मोदी सरकारचे आभार

सीरियातून स्थलांतर केलेले चार भारतीय दिल्ली विमानतळावर पोहोचले

सीरियातून आलेल्या भारतीयांनी मानले मोदी सरकारचे आभार

पश्चिम आशियामधील सीरिया येथे सध्या अस्थिरता असून बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची १४ वर्षांची सत्ता उलथवून टाकली. यानंतर बशर अल-असद यांनी रशियात आश्रय घेतल्याची माहिती असून सीरियामध्ये अशांतता आहे. सीरियामधील अशांततेच्या पार्श्वभूमीवर भारताने ७५ भारतीय नागरिकांना सीरियातून बाहेर काढले होते. सर्व भारतीय नागरिक सुरक्षितपणे लेबनॉनला पोहोचले होते. यानंतर आता बाहेर काढण्यात आलेले चार भारतीय दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत.

भारतीय नागरिकांनी मायदेशात पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त करत त्यांना मायदेशी आणण्याच्या प्रयत्नांबद्दल भारतीय दूतावासाचे कौतुक केले आहे. भारतीय दूतावासाची ही कारवाई सीरियातील हिंसाचारात अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी भारताच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून समोर आली आहे. एका भारतीय नागरिकाने सांगितले की, “मी १५- २० दिवसांपूर्वी तिथे गेलो होतो. तिथे असे काही घडे याची कल्पनाही नव्हती. भारतीय दूतावासाने आम्हाला सुखरूप बाहेर काढले. प्रथम आम्हाला लेबनॉनला नेण्यात आले आणि नंतर गोव्याला नेण्यात आले. गोव्याहून दिल्लीला नेले आणि आज आम्ही आमच्या देशात पोहोचलो आहोत याचा आम्हाला आनंद आहे.”

आणखी एका भारतीय नागरिकाने सांगितले की, “भारतीय दूतावासाने त्यांना दमास्कसला पोहोचण्यास सांगितले आणि त्यानंतर त्यांना बेरूतमध्ये सुरक्षित क्षेत्रात नेण्यात आले. तेथील परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. दररोज रॉकेट आणि गोळ्यांचे आवाज ऐकू येत होते.” असे त्यांनी म्हटले.

दुसरे एक भारतीय नागरिक म्हणाले की, “आम्ही गेल्या चार महिन्यांपासून सीरियामध्ये काम करत होतो. एके दिवशी प्लांटमध्ये काम करत असताना आम्हाला दोन- तीन रॉकेट दिसले. आम्ही दूतावासाला कळवले आणि त्यांनी आम्हाला दमास्कसला येण्यास सांगितले. आम्ही तिथेच राहिलो. एक- दोन दिवसांनी आम्हाला बेरूतमधील सेफ झोनमध्ये नेले गेले. तेथील परिस्थिती अतिशय नाजूक असून मला दूतावास आणि भारत सरकारचे आभार मानायचे आहेत.”

हे ही वाचा : 

हवाई दलाला मिळणार आणखी बळ; ताफ्यात दाखल होणार १२ सुखोई विमाने

सोमवारी लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडणार

रस्‍ते कॉंक्रिटीकरणाच्‍या कामाचा दर्जा तपासा

ठाकरे आता दोन ‘शिफ्ट’मध्ये काम करणार ?

परतलेल्या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय दूतावासाचे आभार मानले आहेत. याआधी शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) सांगितले की, सीरियातील संघर्षामुळे आतापर्यंत ७७ भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की मध्य पूर्व प्रदेशातील भारताचे दूतावास तेथील भारताच्या संपर्कात आहेत आणि गरज पडल्यास ते त्यांना मदत करतील. “आतापर्यंत ७७ भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना स्वेच्छेने परत यायचे होते. त्याव्यतिरिक्त, इतर अनेक भारतीय तिथे स्थायिक झाले आहेत. अनेकांनी लग्न केले असून काही व्यवसाय करत आहेत. ते तेथे स्थायिक झाले आहेत आणि अजूनही तिथे राहत आहेत. पण, जर त्यांना परतायचे असेल तर आम्ही त्यांच्या परतीची सोय करू,” असा विश्वास भारताकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Exit mobile version