गुरुवार, ६ मे रोजी रात्री मालदिवमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात मालदीवचे माजी राष्ट्रपती आणि सध्याचे संसदेचे अध्यक्ष मोहम्मद नाशीद हे जखमी झाले आहेत. नाशीद यांच्यावर मालदिवची राजधानी माले येथे उपचार सुरु असून त्यांना कितपत गंभीर दुखापत झाली याचे तपशील सामोर आलेले नाही.
नाशीद हे गुरुवारी रात्री मालदीवची राजधानी मालेमध्ये होते. त्यांच्या गाडीत बसण्यासाठी त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि तितक्यात एक बॉम्बस्फोट होऊन त्यात ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. नाशीद यांच्या सोबतच त्यांच्या एका अंगरक्षकालाही दुखापत झाल्याची माहिती समजत आहे. त्या दोघांनाही माले येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा:
इस्रायलकडून भारताला वैद्यकीय मदत
‘मुंबई पोलिस रश्मी शुक्लांना अटक करू शकत नाहीत’
कोविड लसींना पेटंटच्या पिंजऱ्यातून सोडवण्यास अमेरिकेचा पाठिंबा
या स्फोटासाठी वापरण्यात आलेला बॉम्ब हा आयईडी स्वरूपाचा असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा बॉम्ब एका दुचाकीत लावण्यात आला होता अशीही माहिती समोर येत आहे. पण या हल्ल्यात नाशीद यांना किती दुखापत झाली याचा तपशील समोर आलेला नाही. तसेच हा बॉम्बस्फोट म्हणजे नाशीद यांच्या हत्येचा कट होता का हे देखील समजू शकलेले नाही.
मोहम्मद नाशीद हे मालदीवच्या मालदीव डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत. मालदीवने लोकशाही स्विकारल्यानंतरचे देशाचे ते पहिले राष्ट्रपती होते. सध्या ते मालदीव संसदेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.