जर्मन नवरदेव आणि रशियन वधू हिंदू पद्धतीने लग्नबंधनात

जर्मन नवरदेव आणि रशियन वधू हिंदू पद्धतीने लग्नबंधनात

गुजरातमधील हिम्मतनगरच्या सरोडिया गावात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. एका परदेशी जोडप्याने हिंदू रितीरिवाजांमध्ये लग्नगाठ बांधली. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, जर्मनीचा क्रिस म्युलरने ज्युलिया उखवाकाटिना या रशियन मुलीसोबत हिंदू पद्धतीने लग्न केले.

म्युलर हा जर्मनीमधील एका श्रीमंत कुटुंबातील सदस्य असून अध्यात्माची आवड असल्यामुळे त्यांनी आपले हे ऐशोआरामाचे जीवन पूर्णपणे सोडून दिले. जगाच्या जवळजवळ प्रत्येक खंडात त्यांनी प्रवास केला आहे. व्हिएतनाममध्ये क्रिस आणि ज्युलिया यांची भेट झाली. २०१९मध्ये त्यांनी अध्यात्माचा अभ्यास केल्यावर त्यांनी हिंदू पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही आपल्या लग्नाचे ठिकाण म्हणून भारताची निवड केली.

हे ही वाचा:

… म्हणून दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ

ब्रिटनमधील शीख खासदाराने हिंदू विरोधी ट्विट हटवले

…म्हणून मोदी सरकारने केली २० यूट्युब चॅनेल बंद

बारावी परीक्षा १५; तर दहावी ४ मार्चपासून

‘भारतात मला स्वतःच्या घरात आल्यासारखे वाटते. माझ्या देशात मला तसे काही वाटत नाही. तिथे अध्यात्म ही फार मोठी गोष्ट नाही,’ म्हणून मी भारताची निवड केल्याचे म्युलरने सांगितले. दरम्यान त्यांनी लालाभाई पटेल यांची भेट घेतली आणि त्यांच्या सरोडिया या गावी गेले. तिथे जाऊन ते गावाच्या आणि तिथल्या लोकांच्या प्रेमात पडले. गावातील लोकांचे एकमेकांसोबतचे जिव्हाळ्याचे संबंध पाहून आनंद झाल्याचे त्याने म्हटले. काही कुटुंबांमध्ये त्यांच्या तीन पिढ्या एकत्र एकाच घरात नांदत असल्याचेही त्याने म्हटले.

कोरोनाच्या निर्बंधांमुळे दोघांचेही कुटुंबीय त्यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. तेव्हा पटेल आणि त्यांच्या पत्नीने सर्व विधी पार पाडले.

Exit mobile version