पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी हे गुरुवार, ४ मे रोजी भारतात दाखल झाले आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी ते भारतात आले आहेत. गोव्यामध्ये ही परिषद होणार असून पाकिस्तानच्या उच्चपदस्थ नेत्याने भारताला भेट देण्याची २०११ नंतर ही पहिलीच वेळ आहे.
दहशतवाद या मुद्द्यावरून दोन्ही देशांचे संबंध ताणलेले असताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी स्वतंत्र चर्चा होणार नसल्याची प्राथमिक माहिती आहे. ‘पाकिस्तान एससीओच्या ध्येयाशी कटिबद्ध असल्यामुळे आपण या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला,’ असे भुत्तो म्हणाले.
भारतामधील एससीओच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय म्हणजे एससीओचा जाहीरनामा आणि बहुस्तरीय पातळीवर संवाद साधण्याशी कटिबद्धता असल्याचे मत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी व्यक्त केले आहे.
१२ वर्षांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारतात
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री तब्बल १२ वर्षांनी भारतात आले आहेत. यापूर्वी २०११ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खर भारतात आल्या होत्या. सध्या त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री आहेत. त्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले होते. तर, २०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला भेट दिली होती.
बिलावल भुत्तो यांची भारताविरोधात वादग्रस्त विधाने
- काश्मीर मुद्द्यावर बोलताना त्यांनी २०१४ मध्ये आपल्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ (PPP) च्या कार्यकर्त्यांना सांगितले होते की, “मी संपूर्ण काश्मीर परत घेईन. मी भारतासाठी एक इंचही सोडणार नाही, कारण काश्मीर फक्त पाकिस्तानचे आहे. पाकिस्तानातील इतर राज्यांप्रमाणे काश्मीरही आपले आहे.” यानंतर सोशल मीडियावर त्यांची ‘पाकिस्तानी पप्पू’ म्हणून खिल्ली उडविण्यात आली होती.
हे ही वाचा:
दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प, हजारो भाविक अडकले
पवारांनी सांगितले आणखी १-२ दिवस थांबा!
संरक्षण संशोधन तथा डीआरडीओचा शास्त्रज्ञ अडकला हनी ट्रॅपमध्ये
मी दिलेला सल्ला शरद पवारांच्या पचनी पडेल का? उद्धव ठाकरे यांनी मारला टोमणा
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) त्यांनी काश्मीरचा मुद्दा अनेकवेळा मांडला. मात्र, कधीही संयुक्त राष्ट्रांच्या अजेंड्यात हा मुद्दा समाविष्ट होऊ शकला नाही. तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत त्यांनी जम्मू- काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा आणि सीमांकन आयोगाच्या आदेशाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, पाकिस्तानच्या या मुद्द्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर फार खतपाणी मिळाले नाही.
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बिलावल म्हणाले होते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर संयुक्त राष्ट्रातील भारतीय प्रतिनिधींनी टीकास्त्र डागले होते.