किंग चार्ल्स यांचा शनिवारी ब्रिटनमध्ये राज्याभिषेक होणार आहे. राणी दुसरी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर चार्ल्स हे सम्राट बनले. राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांनी, गेल्या वर्षी ८ सप्टेंबर रोजी प्रिन्स चार्ल्स यांना औपचारिकपणे राजा म्हणून घोषित करण्यात आले होते. आता शाही पद्धतीने त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. जगभरातील मान्यवर या सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होणार आहेत.
विशेष म्हणजे या वेळी पहिल्यांदाच हिंदू, बौद्ध, ज्यू, मुस्लिम आणि शीख धर्मगुरू राज्याभिषेकाच्या विधीमध्ये सहभागी होणार आहेत. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि त्यांच्या पत्नीही उपस्थित राहणार आहेत. तर, अभिनेत्री सोनम कपूर आणि मुंबईचे दोन डबेवाले यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. मुंबई डब्बावाला असोसिएशनचे ब्रिटीश राजघराण्याशी जवळचे नाते आहे. गेल्या वर्षी जेव्हा राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले त्यावेळीही सर्व डब्बावाल्यांनी मुंबईत शोकसभा घेतली होती. तसेच राज्याभिषेकानिमित्त पुणेरी पगडी आणि वारकरी समाजाची एक खास शाल ही अनोखी भेट डब्बेवाले किंग चार्ल्स यांना देणार आहे.
हे ही वाचा:
भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे लोक राष्ट्रवादीत असू शकतात, जयंत पाटलांचा रोख कोणाकडे?
दाऊद इब्राहिमचा प्रश्न ऐकताच पाकिस्तानचे बिलावल गडबडले!
दहशतवादावरून जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला सुनावले
या सोहळ्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक व त्यांची पत्नी उपस्थित राहणार असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन याही उपस्थित राहतील. ७० वर्षांनंतर ब्रिटन पुन्हा एकदा राज्याभिषेकाचे साक्षीदार होणार आहे. राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतरच प्रिन्स चार्ल्स यांना सम्राटाचा दर्जा मिळाला होता. मात्र, आता त्यांचा विधीवत राज्याभिषेक करण्याची शाही परंपरा आज पार पाडली जाणार आहे. हा सोहळा तीन दिवस चालणार आहे. २ हजार २०० हून अधिक शाही पाहुणे, राजघराण्यातील सदस्य आणि विविध देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत.