अरुणकुमार एम नायर हा भारतीय फ्रंटलाईन वर्कर हा तब्बल सहा महिन्यांनंतर कोरोनावर मात करून रुग्णालयातून बाहेर पडला आहे. फुफ्फुसांना गंभीरपणे इजा झाल्यामुळे हा व्यक्ती सहा महिने बेशुद्ध होता. अरुणकुमार एम नायर हे एक ओटी (OT) तंत्रज्ञ असून त्यांनी सहा महिने कृत्रिम फुफ्फुसाचा (ECMO मशीन) आधार घेऊन कोरोनावर मात केली आहे.
या कालावधीतच, त्याने हृदयविकाराच्या झटक्यासह ट्रॅकोस्टोमी आणि ब्रॉन्कोस्कोपी आदी अनेक समस्यांचा सामना केला आहे. त्यांनी केलेली राष्ट्रसेवा आणि त्यांच्या लढाऊ भावनेच्या सन्मानार्थ, VPS हेल्थकेअर या बहुराष्ट्रीय आरोग्य सेवा समूहाने त्यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. प्रकृतीमध्ये चमत्कारिक सुधारणा झाल्याबद्दल एका कार्यक्रमात अरुणकुमार याला त्याच्या अमिरातीच्या सहकाऱ्यांनी आर्थिक मदत सुपूर्द केली.
अरुणकुमार हे मूळचे केरळचे असून त्यांना महिनाभरापूर्वी रूग्णालयातील सामान्य खोलीत हलवण्यात आले होते. पाच महिन्यांहून अधिक काळ ते आयसीयूमध्ये लाइफ सपोर्ट सिस्टमवर होते. मला काहीच आठवत नाही. मी मृत्यूच्या जबड्यातून जेमतेम सुटलो आहे. इतकच आठवत असल्याचे अरुणकुमार म्हणाले. आज मी जिवंत आहे हे माझे कुटुंब, मित्र आणि इतर शेकडो लोकांच्या प्रार्थनांचे बळ आहे असेही अरुणकुमार म्हणाले.
अबू धाबीमधील एलएलएच (LLH) रुग्णालय येथे कोविड १९ टास्क फोर्सचा भाग म्हणून काम करत असताना जुलै २०२१ च्या मध्यात अरुणकुमार यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. २०१३ पासून ते रूग्णालयामध्ये ओटी टेक्निशियन म्हणून काम करत आहेत, अशी माहिती आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते क्वारंटाईन झाले होते परंतु, काही दिवसांनंतर, त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणी केली असता त्याच्या फुफ्फुसांना गंभीर संसर्ग झाल्याचे आढळून आले. नैसर्गिकरित्या श्वास घेऊ शकत नव्हते म्हणून ३१ जुलै रोजी डॉक्टरांनी त्यांना ECMO सपोर्टवर ठेवले. त्यानंतर तब्बल ११८ दिवसांनंतर ECMO सपोर्टमधून ते बाहेर आले.
हे ही वाचा:
नंदूरबारमध्ये गांधीधाम पुरी एक्स्प्रेसला आगीने वेढले
… म्हणून क्रिकेटपटू पीटरसनने मोदींना लिहिले हिंदीतून पत्र
शिवसेना विभाग प्रमुखाला भररस्त्यात महिलेने दिला चोप
‘अनिल देशमुख पोलिसांच्या बदली, पोस्टिंगची यादी द्यायचे’
अरुणकुमार यांनी भारतात आपल्या कुटुंबाला या आजाराविषयी कळवले नव्हते. त्यांनी आपण कामावर असून विशेष कामात आहोत त्यामुळे कोणताही कॉल करणार नाही, अशी माहिती दिली होती. ‘ते कोविड- १९ टास्क फोर्सचा एक भाग म्हणून काम करत असल्याने आम्हाला काहीही चुकीचे असल्याचा संशय आला नाही. पण जेव्हा आम्हाला हॉस्पिटलमधून कॉल आला तेव्हा आम्हाला त्यावर विश्वासच बसला नाही. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अनेक प्रयत्न केले,’ असे त्यांची पत्नी जेनी जॉर्ज म्हणाली.
अरुणकुमार हे लवकरच आपल्या कुटुंबासमवेत आपल्या अन्य कुटुंबियांना भेटण्यासाठी भारतात परत येतील आणि तेथे त्याची फिजिओथेरपी सुरू ठेवली जाईल. पुढच्या महिन्यात पुन्हा कामावर रुजू होऊ असा विश्वास अरुणकुमार याने व्यक्त केला आहे.