भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये सध्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाकिस्तानमधील मृतांची संख्या आता १ हजार ४०० वर पोहचली आहे. दरम्यान, या महापुराच्या संकटकाळात पाकिस्तानमधील नागरिकांच्या मदतीला एक हिंदू मंदिर असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक नागरिकांनी या मंदिरात आश्रय घेतला आहे.
पाकिस्तानमध्ये यंदा जूनच्या मध्यापासून पाऊस सुरू झाला असून मुसळधार पावसामुळे अर्ध्याहून अधिक देश पाण्याखाली गेला आहे. अशातच बलुचिस्तानमधील एका हिंदू मंदिराने आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी मंदिराचे दरवाजे खोलले आहेत. २०० ते ३०० पाकिस्तानी नागरिकांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय मंदिरात करण्यात आली आहे.
कच्छी जिल्ह्यातील जलाल खान गावात टेकडीवर बाबा माधोदास मंदिर आहे. टेकडीवर असल्याने सुदैवाने अजून या मंदिरात पुराचं पाणी गेलेलं नाही. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने या मंदिराचे दरवाजे आश्रय घेण्यासाठी म्हणून खुले करण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर
पाकिस्तान विरुद्ध विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त
“शरद पवार म्हणजे साडेतीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शेहेनशाह”
पंतप्रधान मोदींच्या या १२०० वस्तूंचा होणार लिलाव
पाकिस्तानमध्ये या पूरपरिस्थितीमुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. १ हजार ४०० लोकांनी आपला प्राण गमावला आहे तर १३ हजार हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानला आता नैसर्गिक संकटाचा देखील सामना करावा लागत आहे. तसेच देशाचा जीडीपी कोसळण्याची भीती पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांनी व्यक्त केली आहे. तसेच आता भविष्यात मोठ्या अन्न टंचाईच्या संकटाचा देखील त्यांना सामना करावा लागणार आहे.