पाकिस्तानमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथे सोमवार, ८ जानेवारी रोजी झालेल्या मोठ्या बॉम्बस्फोटात पाच पोलीस ठार झाले आहेत. तसेच या स्फोटात २० हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिस संरक्षण दलाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.
बाजौर जिल्ह्यात पोलिओ विरोधी मोहिमेसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकाला ट्रकमधून नेले जात होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. दरम्यान, आयईडी स्फोटात पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. जखमींना बाजौर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
बाजौरमधील ज्या ठिकाणी पोलीस पथकाला लक्ष्य करण्यात आले तो भाग मामुंद परिसर असून हा भाग अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून पाकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या सीमेवर हल्ले वाढले आहेत.
अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही, मात्र याआधीही पाकिस्तानी तालिबानने पोलिओ लसीकरण मोहिमेवर अनेक हल्ले केले आहेत. त्यामुळे या हल्ल्यामागे पाकिस्तानी तालिबानचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित, विराटचे पुनरागमन
बांग्लादेशमध्ये पुन्हा शेख हसिना यांच्याकडे सत्ता
अजित पवार म्हणाले, ८० वय झालं तरी माणूस थांबत नाही
यापूर्वी रविवारीही पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जण ठार झाले होते. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दोन वाहनांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२३ मध्ये पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये ४१९ दहशतवादी हल्ले झाले, ज्यामध्ये ६२० लोक मारले गेले. ठार झालेल्यांमध्ये ३०६ सुरक्षा कर्मचारी, २२२ नागरिक आणि ९२ दहशतवाद्यांचा समावेश आहे.