आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय फुटबॉल संघटनेवरील प्रशासकांचा अंमल दूर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ही बंदी हटली आहे. शिवाय, १७ वर्षांखालील मुलींच्या वर्ल्डकप आयोजनाचा मार्गही मोकळा झाला आहे.
१५ ऑगस्टला फिफाने अ.भा. फुटबॉल महासंघावर बंदी घातली होती. शिवाय, १७ वर्षांखालील मुलींची वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार नाही, असेही म्हटले होते. ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय फुटबॉल महासंघावर अशी बंदी घातली गेली होती. शिवाय, वर्ल्डकपचे आयोजन जर झाले नाही तर वेगळी नामुष्की ओढवणार होती.
फिफाच्या समितीने हा बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्रयस्थ पक्षातर्फे भारतीय फुटबॉल संघटनेचा कारभार चालविला जात असल्यामुळे ही बंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे ११ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील मुलींच्या वर्ल्डकपवर अनिश्चिततेचे सावट पसरले होते.
हे ही वाचा:
जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे यांना राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार
मढमधील स्टुडिओला मुंबई पालिकेकडून बेकायदेशीर घोषित
सोनाली फोगाट यांना मित्रांनी काहीतरी पाजले
आता फिफाने आशियाई फुटबॉल महासंघाच्या साथीने भारतीय फुटबॉलमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे ठरविले असून लवकरात लवकर कशा निवडणुका होतील, याचा विचार केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने २२ ऑगस्टला भारतीय फुटबॉल महासंघावरील प्रशासकांचा हस्तक्षेप दूर केल्यानंतर भारतीय फुटबॉल महासंघाचे हंगामी महासचिव सुनंदो धर यांनी फिफाला कळविले आणि त्यावरून फिफाने आता ही बंदी हटविली आहे.
आता भारतीय फुटबॉल महासंघाच्या निवडणुका २ सप्टेंबरला होत असून फुटबॉलपटू बायचुंग भुतिया व माजी गोलरक्षक कल्याण चौबे हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमनेसामने असतील.