इराणचा इस्रायलवर कधीही हल्ला होण्याची भीती

भारतानेही नागरिकांना दिला प्रवास न करण्याचा इशारा

इराणचा इस्रायलवर कधीही हल्ला होण्याची भीती

गेल्या महिन्यात दमास्कसमधील इराणच्या वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेला इराण पुढील ४८ तासांत इस्रायलवर युद्ध करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्स, भारत, रशिया, पोलंड आणि ब्रिटन या देशांनी आपल्या नागरिकांना इस्रायलला जाऊ नये, इशारा दिला आहे.

इराण इस्रायलवर उशिराऐवजी लवकर हल्ला करेल, असा अंदाज अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी वर्तवला असून त्यांनी इराणला तसे न करण्याचा इशारा दिला आहे. इराणला दिलेल्या संदेशात, बायडेनने इस्रायलवर आक्रमण करू नये, असे म्हणत इस्रायलचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेची वचनबद्धता अधोरेखित केली.

इस्रायलवर इराण नेमका कधी हल्ला करेल, याबाबतचा तपशील जो बायडेन यांनी दिला नसला तरी अमेरिका इस्रायलचे रक्षण करण्याच्या वचनबद्धतेला गांभीर्याने घेत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. जर्मन एअरलाइन लुफ्थान्सानेही शुक्रवारी त्यांची विमाने यापुढे इराणची हवाई हद्द वापरणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेहरानला जाण्यासाठी आणि तेथून उड्डाण करणाऱ्या हवाईसेवा त्यांनी काही काळासाठी स्थगित केल्या आहेत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही शुक्रवारी अधिसूचना जाहीर करून भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्यास सांगितले आहे. सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून आपली नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आणि त्यांच्या हालचाली कमीत कमी मर्यादित ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. इस्रायलमधील भारतीय दूतावासाने देशातील भारतीय नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळा, शांत रहा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे.

इराण पुढील ४८ तासांत इस्रायलवर थेट हल्ला करेल, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आहे. तर, शुक्रवारी लवकरच हल्ला होऊ शकतो, असे दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी सीबीएस न्यूजला सांगितले आहे. या हल्ल्यात १००हून अधिक ड्रोन, डझनभर क्रूझ क्षेपणास्त्रे आणि संभाव्यतः आंतरखंडिय क्षेपणास्त्रांचा समावेश असू शकतो.

सीरियातील इराणी वाणिज्य दूतावास उद्ध्वस्त केल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. यात इराणचा एक उच्च लष्करी कमांडर आणि सहा अधिकारी ठार झाले. इराणने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. तर, गाझा आणि लेबनॉनच्या सीमेवर इस्रायलशी लढा देणाऱ्या अतिरेकी गटांना पाठिंबा देणाऱ्या इराणमधील लष्करी अधिकाऱ्यांना इस्रायलने लक्ष्य केल्याचे सांगितले जाते. मात्र या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी इस्रायलवर हल्ला ‘अपरिहार्य’ असल्याचे म्हटले होते.

हे ही वाचा:

डायनासोरसारखी नामशेष होईल ‘काँग्रेस’

वानखेडेवर ‘सूर्या’ तळपला!

वानखेडेवर कोहलीचे ‘विराट’ मन

शाब्बास डीके! रोहीतची कार्तिकला कौतुकाची थाप…

गुरुवारी, इस्रायलमधील यूएस दूतावासाने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तेल अवीव, जेरुसलेम आणि बेअर शेवा बाहेर प्रवास न करण्यास सांगितले आहे. फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयाने फ्रेंच नागरिकांना इराण, लेबनॉन, इस्रायल आणि पॅलेस्टिनी प्रदेशात न जाण्याचा सल्ला दिला आहे. इराणस्थित राजनैतिक अधिकाऱ्यांचे नातेवाईक फ्रान्सला परत जातील आणि फ्रेंच नागरी सेवकांना या प्रदेशातील कोणत्याही मोहिमेवर बंदी घालण्यात आली आहे.

Exit mobile version