आयएसआयच्या पगारावर असलेल्या दहशतवाद्याची संयुक्त अरब अमिराती मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुखमीत पाल सिंह उर्फ सुख भिकारीवाल असे दहशतवाद्याचे नाव आहे. शौर्यचक्र विजेत्या बलविंदर सिंग संधू यांची हत्या करून सुखमीत पाल फरार होता. पण त्याला संयुक्त अरब अमिरातीने भारताच्या ताब्यात दिले आहे. भारत सरकारच्या कूटनीतीचे हे यश आहे.
शौर्यचक्र विजेते बलविंदर सिंग संधू यांनी १९९० साली पंजाब मधील फुटीरतावाद्यांविरोधात लढा दिला होता. १६ ऑक्टोबर रोजी संधू यांची त्यांच्या राहत्या घरी खून करण्यात आला होता. या प्रकरणात भिकारीवाल हा ‘वॉन्टेड’ होता. ‘रॉ’ अधिकारी भिकारीवालच्या मुसक्या आवळून त्याला भारतात घेऊन आले आणि त्याला दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ च्या हवाली केले. ‘स्पेशल सेल’ हा दहशतवाद विरोधी सेल म्हणूनही ओळखला जातो.
पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’च्या हुकुमावरून भिकारीवालने संधू यांच्या हत्येचा कट रचला अशी माहिती ‘स्पेशल सेल’ ने दिली. संधू हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी ५ जणांना अटक केली. या कारवाई नंतरच भिकारीवालचे नाव समोर आले आहे. भिकारीवाल हा आयएसआय पुरस्कृत खलिस्तानी नेत्यांच्या आज्ञेने काम करत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख प्रमोद सिंह कुशवाह यांनी दिली.
संधू हत्या प्रकरणात दिल्ली पोलीस आणि पंजाब पोलिसांनी भिकारीवालची चौकशी सुरु केली आहे.