आता श्रीकृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिराची प्रतीक्षा

आता श्रीकृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिराची प्रतीक्षा

अयोध्येत राम मंदिर साकार होते आहे, आता कृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिर बनण्याची प्रतीक्षा आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी श्री राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर कृष्णमंदिराचा प्रश्नही लवकर मार्गी लागावा, अशी प्रार्थना केली आहे. श्री कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने हे कार्यही तडीस जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या श्री कृष्ण जन्मभूमीचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. मथुरेत १७व्या शतकातील मशीद श्रीकृष्ण जन्मभूमीवर आक्रमण करून उभारण्यात आल्याचा दावा अनेक कागदपत्रांच्या आधारे करण्यात आला आहे. ती मशीद तिथून हलविण्यात यावी आणि ही जागा श्री कृष्ण जन्मभूमी म्हणून विकसित केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मंदिरासाठी १३.३७ एकर जमीन श्री कृष्ण जन्मभूमीसाठी मुक्त करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

यासंदर्भात ज्यांनी याचिका केली आहे ते महेंद्र प्रताप सिंह यांचे म्हणणे आहे की, भारतात अनेक ठिकाणी मंदिरांचा विध्वंस करून तिथे मशिदी उभारण्यात आल्या. मथुरेतही श्रीकृष्णजन्मभूमीवर आक्रमकांनी मशिद उभारली. त्या जागेएवढी किंवा त्याच्यापेक्षा दीडपट जागा ब्रज क्षेत्राच्या बाहेर दिली गेल्यास हा प्रश्न सुटू शकेल. त्यासाठी शाही मशीद इदगाह समिती आणि सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड यांनी शांततापूर्ण मार्गाने हा पर्याय स्वीकारल्यास या प्रकरणाचा तिढा सुटेल.

Exit mobile version